महाराष्ट्र अंनिसने केले पोळी दान करण्याचे आवाहन
नवी मुंबई : होळीसारख्या पारंपरिक सणाचा कालसुसंगत व अर्थ लक्षात घेऊन स्वतःमधील तसेच पुढच्या पिढीतील दुर्गुणांची व दुष्प्रवृतींची होळी करणे असा कृतिशील विधायक पायंडा समाजात रुजवणे आता अत्यंत आवश्यक झाले असल्याने मेहनतीची, कष्टाची कामे करून दिवस कंठणारे कष्टकरी बांधव आजही उघड्यावर राहतात, त्यांच्या घरात त्यांना सणासुदीलासुद्धा गोडधोड करणे शक्य होत नाही अशा कुटुंबांना होळीची पोळी त्यांच्याकडे सन्मानपूर्वक पोहचवू या असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीने केले आहे.
खाद्यपदार्थ होळीत न टाकता गरजूंच्या, भुकेलेल्यांच्या पोटातील आग शमवण्याचा संकल्प करून तो प्रत्यक्ष कृतीत आणावा यासाठी गेली काही वर्षे महाराष्ट्र अंनिस योग्य ते प्रयत्न करीत असून त्यांना मिळणारा प्रतिसादही चांगला असल्याचे पाहायला मिळत आहे. पेटत्या होळीभोवती परंपरेनुसार विशेषतः महिलांच्या संदर्भात अतिशय अश्लील शब्द वापरून बोंबा मारण्याची अनिष्ट प्रथा अजूनही आपल्याकडे काही भागात टिकून आहे. याऐवजी होळीच्या ठिकाणी सांघिकपणे प्रबोधनपर सामाजिक, सांस्कृतिक गाणी, गीतं म्हटली तर एक चांगला नाविन्यपूर्ण पायंडा आपण घातल्याचे समाधान आपल्याला नक्कीच मिळेल. धुलीवंदनामध्ये रासायनिक रंगांचा वापर न करता, वनस्पती रंगांचा वापर करून, पाण्याशिवाय धुलीवंदन आणि रंगपंचमी आपणास खेळता येऊ शकेल. म्हणून नागरिकांनी होळी अतिशय लहान करावी; लाकडे, गोवऱ्या, टायर किंवा तत्सम ज्वलनशील पदार्थ जाळून होळी करू नये. असेही नम्र आवाहन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने अशोक निकम यांनी केले आहे.