प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
महापौर पदी शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर पदी कृष्णा पाटील बिनविरोध
ठाणे : ठाणे महापालिकेतील ३ वर्षे १० महिन्यांची प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून या ठिकाणी ‘शिवसेना शिंदे गट'च्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर महापौर पदी तर ‘भाजपा'चे कृष्णा पाटील उपमहापौर पदी विराजमान झाले आहेत.
१५ जानेवारी रोजी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘शिवसेना शिंदे गट'चे ७५, ‘भाजपा'चे २८, ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)'चे १२, ‘राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)'चे ९, ‘एमआयएम'चे ५, ‘शिवसेना उबाठा'चे १, अपक्ष १ असे एकूण १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. ठाणे महापालिका मध्ये सत्ता स्थापनेसाठी एकूण ६६ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक होते. पण, ‘शिंदे गट'कडे ७५ आणि अपक्ष अशा एकूण ७६ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेवर ‘शिवसेना शिंदे गट'चे संख्याबळ जास्त असल्याने त्यांचाच महापौर होणार असल्याचे निश्चित झाले होते.
यानंतर झालेल्या घडामोडीनंतर ‘भाजपा'ने देखील ठाणे महापालिका महापौर पदाचा दावा मागे घेतला आणि ‘शिंदे सेना'सोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘ठाणे'च्या महापौर पदी ‘शिंदे सेना'च्या शर्मिला पिंपळोलकर यांची तर उपमहापौर पदी ‘भाजपा'च्या कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानुसार त्यांच्या निवडीची ३ फेब्रुवारी रोजी विशेष सभेमध्ये औपचारिकता पूर्ण करुन अधिकृत घोषणा करण्यात आली. या सभेचे पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी, तर सचिव म्हणून महापालिका सचिव मनिष जोशी यांनी कामकाज पाहिले.
दरम्यान, महापौर आणि उपमहापौर विराजमान झाल्याने ३ फेब्रुवारी पासून ठाणे महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्ठात येऊन आता लोकप्रतिनिधींचे राज्य सुरु झाले आहे.
दरम्यान, महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांचे तुळशीचे रोप देऊन अभिनंदन केले.