इंदोर महापालिकेच्या अभ्यासगटाची नवी मुंबईत स्वच्छता पाहणी

नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत काही वर्षांपासून देशात सातत्याने पहिल्या ३ क्रमांकामध्ये अग्रभागी असणाऱ्या ४ शहरांची ‘सुपर स्वच्छ लीग' अशी एक विशेष कॅटेगरी निर्माण करण्यात आलेली आहे. त्यामध्ये नवी मुंबईसह मानांकित असणाऱ्या इंदोर महापालिकेतील अभ्यासगटाने नवी मुंबई महापालिकेला भेट देऊन विविध प्रकल्पांची पाहणी केली. या भेटीत त्यांनी नवी मुंबईत आधुनिक तंत्रप्रणालीचा अंगिकार करुन केल्या जात असलेल्या नाविन्यपूर्ण कामांची प्रशंसा केली.

दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यात अभ्यासगटाने नवी मुंबई महापालिका मुख्यालय वास्तुच्या रचनेचे आणि तेथील अत्याधुनिक सुविधांचे आणि प्राधान्याने येथील स्वच्छतेचे कौतुक केले. दैनंदिन कचरा संकलन आणि वाहतुक प्रणालीचे नियमित निरीक्षण आणि त्यावर नियंत्रण करणाऱ्या मुख्यालयात पहिल्या मजल्यावर स्थापित इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटरला भेट देऊन त्यांनी संपूर्ण प्रणाली जाणून घेतली. कोणते वाहन कुठे आहे, त्याने कोणत्या वेळी कुठल्या कचरापेटीतील कचरा संकलित केला यावर कचऱ्याच्या डब्यावरील मायक्रोचीपद्वारे तसेच वाहनावरील जीपीएस प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवले जात असल्याची कार्यप्रणाली उत्तम असल्याचे अभिप्राय अभ्यासगटाने दिले.

केंद्रीय वस्त्र मंत्रालय संचलित वस्त्र समिती आणि नवी मुंबई महापालिका यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या वस्त्र कचरा पुनर्प्रक्रिया केंद्राची पाहणी करताना ते प्रभावित झाले. वस्त्र कचरा संकलित करुन तो आकर्षक साहित्याच्या रुपाने पुनर्वापरात आणणाऱ्या प्रकल्पाच्या वेगळेपणाचे त्यांनी कौतुक केले. नेरूळ येथील वंडर्स पार्कमध्ये असलेल्या जगातील आठ आश्चर्यांच्या प्रतिकृतींमधून मनोरंजनाच्या साधनांची तसेच त्यानजिक निर्माण होणाऱ्या सायन्स पार्कचीही त्यांनी माहिती जाणून घेतली.

नेरुळ येथील रूग्णालयात सुरू असलेल्या कॅन्सर रजिस्ट्री आणि डायलेसिस केंद्राला भेट देऊन सध्याच्या परिस्थितीत कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महापालिकेने पुढाकार घेत अत्यंत महत्वाचा आरोग्य उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.

कोपरखैरणे येथील जुनी क्षेपणभूमी बंद करुन त्याठिकाणी फुलविलेले निसर्गोद्यान, तेथील मियावाकी शहरी जंगल प्रकल्प, त्याबाजुलाच असलेल्या सी-टेक मलप्रक्रिया केंद्रातून शुध्द केलेल्या सांडपाण्यावर अधिकची टर्शिअरी ट्रिटमेंट करुन ते पुनर्प्रक्रियाकृत पाणी उद्योगसमुह, बांधकामे, उद्याने यासाठी वापरण्यात येत असल्याची कार्यवाही, ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारक, आदिंचीही या अभ्यासगटाने पाहणी करुन प्रशंसोद्‌गार काढले.

नवी मुंबई नावाप्रमाणेच नाविन्याचा स्विकार करणारे शहर असून शहरातील स्वच्छता, त्यासाठी केले जात असलेले प्रयत्न, त्यामध्ये आधुनिक तंत्रप्रणालीचा केला जात असलेला उपयोग तसेच उल्लेखनीय अशा अभिनव प्रकल्पांच्या माध्यमांतून शहरातील नागरिकांना आणि बाहेरील पर्यटकांना दिल्या जात असलेल्या सुख-सुविधा याचे इंदोर महापालिकेतील अभ्यासगटाने कौतुक केले. नवी मुंबईच्या अतिथ्यशीलतेनेही भारावून गेल्याचे सांगत इंदोर शहराला नक्की भेट द्यावी, असे आमंत्रणही त्यांनी दिले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'चे सर्वात महत्त्वाकांक्षी स्वप्न साकार