प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
निवडणुकीसाठी पोलिसांचे अभेद्य सुरक्षा कवच
उल्हासनगर : महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला असून संपूर्ण शहरात पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. प्रत्येक मतदान केंद्र, प्रमुख चौक आणि संवेदनशील प्रभागांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदानाच्या दिवशी उल्हासनगर शहर एका अभेद्य पोलीस छावणीत रुपांतरित होणार असून, मतदार निर्भयपणे आपला हक्क बजावू शकतील, अशी ग्वाही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या भव्य सुरक्षा नियोजनाबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात २२० पोलीस अधिकारी, १०२५ पोलीस कर्मचारी आणि १०५० होमगार्डस्चा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेची अधिक मजबुती करण्यासाठी ‘राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ)'चे २ प्लॅटून देखील दाखल झाले असून, संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, २ पोलीस उपायुक्त, ४ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि २५ पोलीस निरीक्षकांची वरिष्ठ फळी प्रत्यक्ष मैदानावर कार्यरत असणार आहे.
केवळ मतदान केंद्रांवरच नव्हे, तर बाजारपेठा आणि वादग्रस्त ठरु शकणाऱ्या प्रभागांमध्येही पोलिसांची पायदळ गस्त आणि वाहनांद्वारे पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. कोणत्याही अफवांना थारा न देता आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींविरुध्द तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शांततामय, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात मतदान पार पाडणे हीच प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे उपायुक्त गोरे यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी कोणत्याही दडपणाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.