कचरावेचक महिलांच्या कुमारवयीन मुलांसाठी दोन दिवसीय ‘उडान' शिबीर

पनवेल :  स्त्री मुक्त संघटनेने कुष्ठरोग निवारण समिती नेरे पनवेल येथै कळवा, दिघा, रबाळे, इंदिरानगर, बोनसरी, नोसील व पनवेल येथील कचरावेचक महिलांच्या नववी ते महाविद्यालयातील ५० कुमारवयीन मुलांसाठी दोन दिवसीय ‘उडान' शिबिराचे आयोजन केले होते, पहिल्या दिवशी समुपदेशक अरमान सिंंग व रिया भाटिया यांनी नेतृत्व गुण, आत्मविश्वास, नातेसंबंध, मैत्री व प्रेम या विषयावर मुलांशी संवाद करत अनेक खेळांमधून या गोष्टींचे महत्त्व विशद केले.

स्त्री पुरुष समानता या विषयावरील सत्र स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम यांनी घेतले. मुला-मुलींची वेशभूषा, वेळेची बंधने, करिअर संधी, उच्च शिक्षण या अनेक मुद्द्यावर विद्यार्थ्यांशी चर्चा करत समाजात स्त्री पुरुष समानतेची गरज विशद केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या वंदना शिंदे यांनी दोन दिवस या निवासी शिबिरात राहून विद्यार्थ्यांना चळवळीची गाणी शिकवली. जादू टोणा, उपास तापास, अंगात येणे, भानामती याविषयी भाष्य करत अनेक प्रयोग करून भोंदू बाबा सामान्य माणसाची कशी फसवणूक करतात हे विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत सांगितले. अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डॉ अजित मगदूम यांनी व्यसन, उद्‌भव व उपचार या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. वस्ती पातळीवरील व घरातील व्यसनांचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले विदारक अनुभव व्यक्त केले.  दुसऱ्या दिवशी निळकंठ कोळी शिबिर प्रमुख यांनी कुष्ठरोग निवारण समितीतील अनेक प्रकल्पांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.१२० एकर जागा असणाऱ्या या कुष्ठरोग निवारण समितीत कुष्ठरोग आश्रम, वृद्धाश्रम, विकलांग लोकांसाठी असणारे युनिट त्यांनी दाखवले, विद्यार्थ्यांनी  आजी-आजोबांशी संवाद साधून सतरंजी, टॉवेल, पिशव्या या हातमाग युनिटला विद्यार्थ्यांनी भेट दिली.अन्वय व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते मनोहर तांडेल यांनी खगोलशास्त्र व मानवी जीवन यातील विसंगती पीपीटीच्या माध्यमातून मुलांना समजावून सांगितले. आशा, सीमा, संगीता, दीपा, प्रियांका, विशाखा या कार्यकर्त्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते मानपत्र प्रदान