प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
मलंगगड पयुनिक्युलरचा विवाह सोहळ्यासाठी वापर?
अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील मध्यम गिरीपर्वत रांगेतील श्री मलंगगड येथे लांब पल्ल्याच्या पयुनिक्युलर (रेल्वे ) प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र, आवश्यक असलेल्या विविध शासकीय परवानग्या अद्याप न मिळाल्याने या प्रकल्पाच्या अधिकृत उद्घाटनाचा सोहळा लांबणीवर पडला आहे. असे असतानाही मलंगगडावर आयोजित विवाह सोहळ्यासाठी वधू-वरांना आणि त्यांच्या पाहुण्यांना गडावर पोहोचवण्यासाठी या पयुनिक्युलरचा वापर करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
मलंगगडावर विवाह सोहळा असल्याने, ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'च्या अखत्यारीत असलेल्या पयुनिक्युलरच्या ट्रॉली सजवून वऱ्हाडी मंडळींसाठी वापरण्यात आल्या. सुरक्षा आणि तांत्रिक मंजुरी प्रक्रिया अपूर्ण असतानाही सदर प्रकल्प खासगी कार्यक्रमासाठी वापरला गेल्याने स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
सामान्य नागरिकांसाठी सदर सुविधा उपलब्ध नसताना खासगी सोहळ्यासाठी ती सुरु केल्याबद्दल परिसरात चर्चा सुरु आहे. या संचालनाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यंत्रणा तसेच पयुनिक्युलर प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
शासनाच्या पूर्व परवानग्या, सुरक्षा तपासणी आणि संचालन आदेशांशिवाय कोट्यवधी रुपयांचा सदर सार्वजनिक प्रकल्प खासगी वापरासाठी सुरु करण्यात आला. यामुळे नागरिक सुरक्षा आणि प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा आक्षेप व्यक्त करण्यात येत आहे. प्रकल्पाची सुरक्षा चाचणी पूर्ण होण्यापूर्वीच त्याचा वापर सुरू केल्याने, संभाव्य धोक्यासाठी जबाबदार कोण? याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
या संदर्भात ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'चे अधिकारी प्रशांत मानकर यांना विचारले असता त्यांनी या घटनेची चौकशी सुरु असल्याचे सांगितले.