प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
इंडियन ऑईल टॅकिंग कंपनीकडे ५४७ कोटींची थकबाकी
उरण : उरण तालुक्यातील धुतुम येथील द्रोणगिरी नोड मधील इंडियन ऑईल टँकींग लि. कंपनीने भुईभाड्यापोटी थकविलेल्या ५४७ कोटी रुपये ७ दिवसात भरण्याचे आदेश ‘सिडको'ने दिले आहेत. मुदतीत रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही ‘सिडको'ने कंपनीला नोटीसीद्वारे दिला आहे.
उरण-धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीतील द्रोणागिरी नोड, सेक्टर-१ मध्ये इंडियन ऑईल टँक प्रकल्प आहे. धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या प्रकल्पातून १९९६ पासून जेएनपीए बंदरद्वारे परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या तेलजन्य पदार्थांची साठवणूक करणाऱ्या लाखो किलो लिटर्सच्या टाक्या आहेत. या प्रकल्पासाठी ‘सिडको'ने द्रोणागिरी नोड सेक्टर-१ मधील प्लॉट क्रमांक १०१ वरील भूखंड १७ ऑक्टोबर १९९६ साली भुईभाड्याने दिलेला आहे. मात्र, तेव्हापासून भाड्याने दिलेल्या सदर भूखंडाचे भाडे भरण्यास इंडियन ऑईल कंपनीने सातत्याने दिरंगाईच चालविली होती. कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शासनाचा अतोनात महसूल बुडत असल्याने रांजणपाडा-उरण येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते राम दशरथ पाटील यांनी सिडको, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मागील १५ वर्षांपासून तक्रारीतून कंपनीने आराखड्याप्रमाणे बांधकाम केले नसल्याचे आणि बांधकामाला ओसीही दिलेली नाही.
सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही शासकीय यंत्रणा कारवाई करण्यास सातत्याने टाळाटाळ करीत असल्याने राम पाटील यांनी सदर गंभीर बाब आमदार नाना पटोले यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर पटोले यांनी विधानसभेत तारांकिंत प्रश्न मांडल्यानंतरच जागे झालेल्या ‘सिडको'ने अखेर भुईभाड्यापोटी थकविलेल्या ५४७ कोटी रुपये सात दिवसात भरण्याचे आदेश इंडियन ऑईल टँकींग कंपनीला दिले आहेत, अशी माहिती तक्रारदार राम पाटील यांनी दिली.
बजाविण्यात आलेल्या ५४७ कोटी रुपयांच्या थकीत नोटिसीमध्ये प्रशासकीय खर्च, जीएसटी, दिरंगाई रक्कम, सेवा खर्च आदिंचा समावेश आहे.
दरम्यान, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतानाही इंडियन ऑईल टँकींग कंपनीला ठोठावलेला ५४८ कोटी ३० लाख ९४ हजार २९४ रुपये एवढा दंड सिडको अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा म्हणावा की त्यांचे कंपनीशी असलेले ‘अर्थपूर्ण संबंध' असावेत, याविषयी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे.