ॲक्टीव्हाच्या वाकवलेल्या नंबरप्लेटमुळे ड्रगडिलरचे नेटवर्क उध्वस्त

कल्याण  ः कल्याणच्या पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ मधील अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ तस्करीविरोधात आणखी एक मोठी कारवाई करत ड्रग डीलरचे मोठे नेटवर्क उध्वस्त केले आहे. यामध्ये नायजेरियन नागरिकासह ३ ड्रगडीलरला जेरबंद करण्यात यश आले आहे. या आरोपींकडून तब्बल २ कोटींहून अधिक किंमतीचे एमडी म्हणजेच मेफोड्रोन आणि कोकेनचा साठाही जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ॲक्टीव्हा गाडीच्या वाकवण्यात आलेल्या नंबरप्लेटमुळे ड्रगरॅकेट उध्वस्त करण्यात यश मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.

१३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील गणेशनगर, उंबर्ली गांव परिसरात कल्याण पोलिसांच्या ‘ॲन्टी नार्कोटिक्स सेल'ची प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गस्त सुरु होती. या गस्तीदरम्यान पोलिसांना मुख्य रस्त्याच्या कडेला तिघे इसम संशयास्पद हालचाली करत एकमेकांशी बोलत असल्याचे आढळून आले. त्यांच्यातील एक परदेशी नागरिक पाठीला काळी बॅग घेऊन पिवळ्या रंगाच्या ॲक्टीव्हावर होता. या गाडीची नंबरप्लेट दिसू नये म्हणून मुद्दाम वाकवलेली असल्याचे आढळल्याने पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. या तिघांच्या चौकशीसाठी ‘ॲन्टी नार्कोटिक्स सेल' पुढे जात असतानाच तिघांनीही पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘ॲन्टी नार्कोटिक्स सेल'च्या पोलिसांनी तत्काळ पाठलाग करुन तिघांनाही ताब्यात घेतले.

त्रिकुटाला पकडल्यानंतर पोलिसांनी त्यांची आणि त्या बॅगेची झडती घेतली असता त्यातील अंमली पदार्थ पाहून पोलिसांना धक्काच बसला. आरोपींकडे तब्बल १ किलो ४ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एमडी) (अंदाजे किंमत २ कोटी ८० हजार) आणि १५ ग्रॅम कोकेन (अंदाजे किंमत १५ लाख) आढळून आल्याची माहिती पोलीस उपायुवत अतुल झेंडे यांनी दिली.

सदर कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह-आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पूर्व) संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, ग्रेड पोलीस निरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार देवरे, शिपाई राहुल शिंदे, अमित शिंदे, खुशाल नेरकर आणि खरसाण यांनी केली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कुख्यात ठकसेन गजाआड; ३२ कार जप्त