निवडणुकीच्या तयारीला लागा -राज ठाकरे
अंबरनाथ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. यावेळी बैठकीत मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्याचा त्यांचा निर्णय चर्चेचा विषय ठरला.
अंबरनाथ (पूर्व) येथील पनवेलकर सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथील पदाधिकारी उपस्थित होते. काही महिन्यांपूर्वी ‘मनसे'च्या ३ माजी नगरसेवकांनी पक्ष सोडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र, सदर माजी नगरसेवकांबाबत राज ठाकरे यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, तुमचे मत महत्त्वाचे असून मतदानाच्या बाबत जागरुक रहावे, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.
या बैठकीत माध्यमांना प्रवेश दिला गेला नाही, तसेच पदाधिकाऱ्यांनाही हॉलमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती. राज ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या मते, जेव्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकींमध्ये मोबाईल वापरतात, तेव्हा त्यांचे लक्ष नेत्यांच्या भाषणापेक्षा मोबाईलमध्येच जास्त असते. सेल्फी काढणे, फोटो काढणे आणि कार्यक्रमाचे शूटिंग करणे यांसारख्या गोष्टींमुळे महत्त्वाचा संवाद साधता येत नाही आणि बैठकीचा उद्देश बाजूला राहतो.
या मेळाव्यात ‘मनसे'च्या अंबरनाथ मधील नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. अविनाश सुरसे यांची शहर सचिवपदी, तर दत्ता केंगरे, कैलास पाटील, समाधान राजपूत, रमेश पाटील आणि संग्राम देसाई यांची शहर संघटकपदी निवड करण्यात आली. तसेच प्रशांत नलावडे, अनिल राऊत आणि योगेश सासे यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. अंबरनाथ (पश्चिम) शहर संघटकपदी राजू म्हात्रे आणि अजयसिंग ठाकूर यांची निवड करण्यात आली, तर संदीप भोईर, ऐसामुद्दीन खान (बबलू) आणि विनोद ठाकरे यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली.
दरम्यान, मेळाव्यासाठी शहर अध्यक्ष शैलेश शिर्के सह इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.