पनवेल रेल्वे स्टेशनजवळ वाहतूक कोडीची समस्या

नवीन पनवेल : पनवेल रेल्वे स्टेशन जवळ होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे येथील मोठ्या सर्कलचा घेर कमी करण्याची मागणी प्रवासी तसेच नागरिक करीत आहेत. या सर्कलचा घेर कमी केल्यास होणारी वाहतूक कोंडी कमी होईल, असे या सर्वांचे म्हणणे आहे.

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी नेमाची झाली आहे. मोठ्या प्रमाणावर रिक्षा या ठिकाणी असल्याने रिक्षांची गर्दी होते. चालक कशाही पध्दतीने आणि कुठेही रिक्षा पार्क करीत असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. याशिवाय सदर ठिकाणी असलेल्या सर्कलजवळ बेकायदेशीररित्या टॅक्सी परमिटच्या चार चाकी गाड्या लागतात. अधिकृत थांबा नसताना देखील चार चाकी वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. पनवेल रेल्वे स्थानकातून दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी कामानिमित्त ये-जा करीत असतात. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात नेहमीच वर्दळ सुरु असते. मात्र, बऱ्याचदा अनेकांना येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीत जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. रिक्षा चालकांसोबत अनेकदा बाचाबाची देखील होतात, काही वेळेला प्रवासी भाड्यावरुनही वाद होतात. वर्दी नसणे, रिक्षा चालवण्याचा परवाना, रिक्षाची कागदपत्रे तसेच रिक्षा नूतनीकरण नसताना देखील काही रिक्षा चालक या ठिकाणी व्यवसाय करतात. त्यामुळे आरटीओ तसेच पनवेल वाहतूक विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

दरम्यान, पनवेल रेल्वे स्थानकासमोर भले मोठे सर्कल बांधण्यात आलेले आहे. या सर्कलचा घेर कमी केल्यास साहजिकच या जागेचा वापर अधिक करता येईल. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यात सर्कलला लागून चारचाकी टी परमिटच्या गाड्या बेकायदेशीररित्या उभ्या असतात. त्यामुळे येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कायमस्वरुपी वाहतूक पोलीस रेल्वे स्टेशन जवळ नेमावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ' एसटी बससेवेचे लोकार्पण