प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका ॲक्शन मोडवर
भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता कराची वसुली नेहमीच कमी होत राहिल्याने वादग्रस्त ठरली आहे. थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी भिवंडी महापालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा थकीत मालमत्ता करावरील व्याजात १०० टक्के सूट देणारी अभय योजना आर्थिक वर्षअखेर ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. एप्रिल २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान आयुक्त अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मालमत्ता कर वसुली कर्मचाऱ्यांनी ६५ कोटी रुपयांची मालमत्ता कर वसूल करण्यात यश मिळवले आहे. मागील आर्थिक वर्षात या दरम्यान फक्त ४६ कोटी रुपयांची वसुली झाली होती. ज्यामध्ये यावेळी १९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर यांनी दिली आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये ३ टप्प्यात व्याजदरात सूट देणारी अभय योजना लागू केली होती. यामध्ये ७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान व्याजदरात १०० टक्के सूट योजनेत २५ कोटी ६४ लाख वसुली झाली होती. त्यानंतरच्या ७५ टक्के व्याजदरात सूट देण्याच्या टप्प्यात १३ कोटी १३ लाख अशी एकूण ३८ कोटी ७७ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला. यामध्ये २६,६७४ मालमत्ताधारकांना ७ कोटी ७१ लाख रुपयांची व्याज दरातील सूट देण्यात आली आहे. डिसेंबर आणि जानेवारी दरम्यान महापालिका निवडणुकीमुळे अनेक कर्मचारी निवडणूक कार्यात अडकून पडल्याने वसुली काही प्रमाणात थंडावली होती.
या महिन्याच्या १५ दिवसानंतर रमजान महिना सुरु होणार असल्याने पुन्हा मालमत्ता कर वसुलीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून या काळात असलेली व्याजदरातील ५० टक्के सूट वाढवून थकीत मालमत्ताकरांवरील व्याजदरात १०० टक्के सूट देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे , अशी माहिती उपायुवत बाळकृष्ण क्षीरसागर यांनी दिली आहे.
मालमत्ता कर शहर विकासासाठी आवश्यक असून नागरिकांना नागरी सुविधा देण्यासाठी निधी वापरात आणला जातो. पण, मालमत्ता कर न भरल्याने शहर विकासाला खीळ बसून त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होऊ शकतो. त्यामुळे मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. मार्चनंतर थकित मालमत्ता धारकांवर जप्तीची कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये महापालिका प्रशासन कोणाचाही मुलाहिजा बाळगणार नसल्याचा इशारा बाळकृष्ण क्षीरसागर यांनी दिला आहे.
या आर्थिक वर्षात ३१ जानेवारीपर्यंत ५५,४८३ मालमत्ता धारकांनी ६५ कोटी १७ लाख ८४ हजार २९८ रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला असून यामध्ये प्रभाग समिती क्रमांक-३ अव्वल स्थानी असून येथे १५ कोटी ६५ लाख ८३ हजार ५८७ रुपये मालमत्ता कर वसूल झाला आहे. त्याखालोखाल प्रभाग समिती क्रमांक-२ मध्ये १४ कोटी २३ लाख २ हजार २९७ रुपये, प्रभाग समिती क्रमांक-१ मध्ये १३ कोटी ९० लाख ८३ हजार ८७, प्रभाग समिती क्रमांक-४ मध्ये १२ कोटी ३३ लाख ७६ हजार ९१७ रुपये तर प्रभाग समिती क्रमांक-५ मध्ये ९ कोटी ४ लाख ३७ हजार ६१७ रुपये वसूल करण्यात आले आहेत.
मालमत्तांचा शोध घेण्यासाठी जीआयएस सर्वेक्षण...
भिवंडी महापालिका क्षेत्रात आजही मोठ्या प्रमाणावर मालमत्तांवर कर आकारणी झालेली नाही. हजारो मालमत्तांवर दुबार कर आकारणी झालेली आहे. तर अनेक मालमत्तांच्या वापर क्षेत्रफळात अतिरिक्त बदल केलेला आहे. परंतु, कमी क्षेत्रफळाचा मालमत्ता कर भरला जात आहे. यासाठी अशा कर आकारणी न झालेल्या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी आणि मालमत्ता धारकांनी वापर क्षेत्रफळामध्ये अतिरिक्त वापर क्षेत्रफळाचा शोध घेण्यासाठी महापालिका क्षेत्रात जोग्रॉफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम (जीआयएस) सर्वेक्षण सुरु केले आहे. रिपिलट आणि मॅप माय इंडिया (एमएमआय) या संस्थांतर्फे सदर सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत ८६०० मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले असून यापैकी साधारण ४० टक्के अर्थात ३४०० मालमत्तांमध्ये क्षेत्रफळात बदल केल्याचे आढळून आले आहे. अशा ४०६ मालमत्ता धारकांना नोटीस बजावून त्यांना आपल्याकडील कागदोपत्री पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.