समुद्रातील खारे पाणी भातशेतीत, हजारो एकर शेतजमीन नापीक

उरण : उरण तालुक्यातील खोपटा, आवरे, पिरकोण, गोठवणे, चाणजे, वशेणी, पुनाडे, विंधणे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्तीच्या कामांकडे ‘खारभूमी सर्वेक्षण विभागा’च्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सदर शेतजमिनीमध्ये समुद्राचे खारे पाणी शिरत आहे. त्यामुळे हजारो एकर शेतजमीन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, खारभूमी सर्वेक्षण आणि अन्वेषण विभाग, पेण येथील अधिकाऱ्यांनी बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

उरण परिसरामधील पूर्व विभागातील आणि चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन भातशेती आहे. परंतु, गेली अनेक वर्षे खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्तीची कामे न केल्याने समुद्रातील खारे पाणी भातशेतीत शिरत आहे. त्यात जेएनपीए (JNPA) आणि करंजा बंदरात यापूर्वी करण्यात आलेल्या दगड-मातीच्या भरावामुळे समुद्रातील उधाणाचे पाणी सातत्याने भातशेतीत शिरत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन धोक्यात आले आहे. असे असताना देखील शासन पुन्हा एकदा चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील १०० एकर जागेवर भराव टाकून 'मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क' उभारण्याच्या तयारीत असून एमआयडीसी (MIDC) आणि मेरिटाईम बोर्डाने त्यासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे चाणजे, खोपटा, गोवठणे, वशेणी, पुनाडे, आवरे, पिरकोण, विंधणे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील उरल्यासुरल्या भातशेतीत उधाणाचे पाणी शिरून खारफुटीचे जंगल वाढण्याचा तसेच भातशेती नापीक होण्याचा संभव आहे. त्यामुळे खारभूमी सर्वेक्षण आणि अन्वेषण विभाग, पेण येथील अधिकाऱ्यांनी पाहणी करून बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

"खारभूमी सर्वेक्षण आणि अन्वेषण विभाग, पेण येथील कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्याकडे उरण तालुक्यातील बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु, निधी उपलब्ध होऊ न शकल्याने सदरची कामे रेंगाळत पडली आहेत. त्यामुळे शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आमची मागणी आहे." - सत्यवान भगत, अध्यक्ष - उरण तालुका मनसे.

"उरण तालुक्यात काही अंशी बांध दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तसेच खोपटा परिसरातील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी राज्य आणि केंद्र शासन स्तरावर सतत प्रयत्न केले जात आहेत. लवकरात लवकर सदरची कामे मार्गी लागतील." - खारभूमी सर्वेक्षण-अन्वेषण विभाग, पेण.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तळोजामधील ३ कारखान्यांना भीषण आग