मुंबई आणि नाशिकमधील पत्रकारांवरील हल्ल्याच्या नवी मुंबईतील पत्रकारांकङून निषेध, पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी
नवी मुंबई : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील पत्रकार एकवटले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
त्र्यंबकेश्वर येथे काही गुंडांनी तीन ते चार इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना बेदम मारहाण केली होती, ज्यात अनेक पत्रकार गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पत्रकारांवर हल्ले वाढत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईतील पत्रकारांनी सरकारला तातडीने पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
या निषेध आंदोलनादरम्यान, पत्रकारांनी सरकारला पत्रकार संरक्षण कायद्याचे नोटिफिकेशन त्वरित काढण्यास सांगितले. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावीत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. जर सरकारने याकडे दुर्लक्ष केले, तर पत्रकारांना आणखी कठोर पावले उचलावी लागतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निषेध आंदोलनात पत्रकारानी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून निषेध व्यक्त केला. काळ्या कपड्यांच्या माध्यमातून सरकारला पत्रकारांच्या सुरक्षेची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती करण्यात आली. या घटनेची सरकारने गांभीर्याने नोंद घेऊन पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांवर अंकुश ठेवावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.