प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
‘अंबरनाथ'च्या वैद्यकीय महाविद्यालयाचा अजब कारभार
अंबरनाथ : अंबरनाथच्या जमिनीवर आणि स्थानिक जनतेच्या संसाधनांवर आकाराला येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा लाभ अंबरनाथकरांना मिळण्याऐवजी शेजारच्या कल्याण शहराला मिळणार असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सदर वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथमध्ये असूनही, येथील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी चक्क कल्याण-डोंबिवली महापालिकेसोबत ७ वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार अंबरनाथचे विद्यार्थी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि शक्तीधाम प्रसुतिगृहात सेवा देणार असल्याने अंबरनाथकरांमध्ये फसवणुकीची तीव्र भावना निर्माण झाली आहे.
या वादाचे मुख्य कारण अंबरनाथ मधील फार्मिंग सोसायटीची २१० एकर जमीन आहे. उच्च न्यायालयाने सदर जमीन शासनाकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच या जागेची पाहणी केली. मात्र, मुख्य इमारतीचे बांधकाम अद्याप सुरु झाले नसल्याने महाविद्यालय तात्पुरत्या स्वरुपात अंबरनाथच्या डेंटल कॉलेजमध्ये सुरु आहे. सध्या येथे २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नियमानुसार या विद्यार्थ्यांची सेवा अंबरनाथच्या डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रीन सिटी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मिळणे अपेक्षित असताना, प्रशासनाने मात्र स्थानिकांना डावलून कल्याणच्या रुग्णालयांना प्राधान्य दिले आहे.
‘केडीएमसी'च्या आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी या वृत्ताला दुजोरा देताना स्पष्ट केले की, जोपर्यंत महाविद्यालयाची स्वतःची इमारत पूर्ण होत नाही किंवा सात वर्षांचा कालावधी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सदर सेवा कल्याणच्या रुग्णालयांना मिळेल, असा लेखी करार झाला आहे. या धक्कादायक माहितीनंतर अंबरनाथ मधील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. माजी नगरसेवक आणि रुग्णमित्र उमर इंजिनिअर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष वर्मा यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे. शहरातील छाया रुग्णालयात सध्या हाडांचे डॉक्टर आणि स्त्रीरोग तज्ञ नसल्याने शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. रुग्ण अधिकारी सुट्टीवर आहेत; अशा परिस्थितीत महाविद्यालयाचे तज्ञ डॉक्टर बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
अंबरनाथकरांच्या पैशातून आणि हक्काच्या जागेवर उभ्या राहणाऱ्या या महाविद्यालयाची सेवा ‘रेफर'च्या नावाखाली वणवण करणाऱ्या स्थानिक रुग्णांना का मिळत नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या संदर्भात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी प्रशासनाकडून लवकरच स्पष्टीकरण दिले जाईल असे आश्वासन दिले असले, तरी ७ वर्षांच्या या दीर्घ करारामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे. हक्काची रुग्णसेवा आपल्याच शहरातील रुग्णालयात मिळेपर्यंत अंबरनाथचा सदर लढा शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.