‘पनवेल'ला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

महापौर पदासाठी नितीन पाटील, उपमहापौर पदासाठी प्रमिला पाटील यांचे उमेदवारी अर्ज

पनवेल : पनवेल महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी ‘भाजपा महायुती'कडून ६ फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महापौर पदासाठी नितीन पाटील, तर उपमहापौर पदासाठी प्रमिला पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज पनवेल महापालिका नगरसचिव नानासाहेब कामठे यांच्याकडे सादर केले. नितीन पाटील यांच्या निवडीमुळे पनवेल शहराला आगरी समाजाचा पहिला महापौर लाभणार असून सदर बाब समस्त आगरी समाज आणि पनवेलसाठी ऐतिहासिक ठरली आहे.

पनवेल महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक-२०२६ ‘भाजपा महायुती'ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लढवली. या निवडणुकीत ‘भाजपा'ने ५५, ‘शिवसेना'ने २ आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस'ने २ जागांवर विजय मिळवत एकूण ५९ जागांसह पनवेल महापालिकेवर पुन्हा एकदा ‘भाजपा महायुती'ची भक्कम सत्ता प्रस्थापित केली आहे.

१० फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने ‘भाजपा महायुती'कडून अर्ज दाखल करण्यात आले. महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रदेश कार्यालयाकडे नावे सुचवण्यात आली. त्यांच्या मान्यतेने सदर निवड करण्यात आली असून महापौर आणि उपमहापौर पदासाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. अर्ज दाखल करताना भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, ‘राष्ट्रवादी'चे नेते शिवदास कांबळे, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आणि तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्यासह महायुतीमधील नेत्यांनी नितीन पाटील व प्रमिला पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालकरीता शुभेच्छा दिल्या.

नितीन पाटील, प्रमिला पाटील यांना समाजकार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचा फायदा पनवेल महापालिकेला होणार आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यास बरोबर जनतेला अपेक्षित असा महापालिकेचा सर्वांगीण विकास ते करतील. भाजपा प्रदेश कार्यकारिणीने घेतलेला त्यांच्या निवडीबद्दल चांगला निर्णय घेतला. आमदार प्रशांत ठाकूर आणि सर्व नेत्यांचे सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे धोरण आहे. त्यामुळे ‘भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुती'चा कायम चांगला समन्वय आहे.
- परेश ठाकूर, माजी सभागृह नेते -पनवेल महापालिका. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उरणमध्ये शांततेत मतदान