महासभेत गाजला डंपिंग ग्राऊंडसह पाणी टंचाईचा मुद्दा

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेची १८ मार्च रोजी पार पडलेली महासभा शहरवासियांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांमुळे अत्यंत वादळी ठरली. या सभेत डंपिंग ग्राऊंडची समस्या, शहराच्या विविध भागांत साचलेली अस्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि पाडलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यात टाकला जाणारा कचरा या मुद्द्यांवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विशेषतः अस्वच्छता आणि तुंबलेली गटारे तत्काळ साफ करण्याची मागणी करत लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला. शहरातील पाणी टंचाई आणि ‘वॉल्व्हमन'च्या बदल्यांच्या मुद्द्यावरुनही सभागृहात जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यावर बोलताना नगरसेविका दुर्गा राय यांनी शाळा क्रमांक-२४ चा संदर्भ देत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढले. महापालिका सभागृहात चालण्यासाठी महागडे कालीन अंथरले जात असताना दुसरीकडे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र जमिनीवर बसावे लागते, अशी खेदजनक बाब असल्याचे राय यांनी नमूद केले. प्रशासनाच्या प्राथमिकतेवर सवाल उपस्थित करत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याची आग्रही मागणी केली. या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि प्रशासन दोघांवरही सभागृहात टीकास्त्र डागण्यात आले.

महासभेच्या उत्तरार्धात स्थायीी समितीसह इतर विशेष समित्यांच्या नव्या रचनेची घोषणा करण्यात आली. राजकीय गणिते जुळवत शिवसेना (शिंदे गट), वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष सदस्यांनी एकत्रित येत ‘उल्हासनगर विकास आघाडी'ची स्थापना केली आहे. या ‘आघाडी'च्या वतीने स्थायी समितीसाठी दिलीप गायकवाड, भुल्लर महाराज, जया प्रकाश माखीजा, जमनू पुरसवानी, सहोता कुलवंत सिंग, महेश सुखरमानी, डिंपल नरेंद्र ठाकूर आणि विकास खरात यांची नावे निश्चित करण्यात आली. तर ‘भाजपा'कडून राजेश वाधरिया, अर्चना करणकाळे, कविता पंजाबी, रवि ज्ञांसी, दीपक शेरवानी, राजेश वानखेडे, शंकर शेरी लुंड आणि संजय सिंग अशा एकूण १६ सदस्यांच्या नावांची घोषणा झाली. यासोबतच यंदा ८ ऐवजी ९ विशेष समित्यांची रचना करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यात महसूल समितीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘शोभायात्रा'मध्ये विकास प्रकल्पांचा चित्ररथ प्रमुख आकर्षण