‘सिडको'च्या सेंट्रल पार्क उद्यानाची दुरवस्था

खारघर : ‘सिडको'च्या खारघर मधील ‘सेंट्रल पार्क' उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली असून चिल्ड्रन पार्क मधील सर्व खेळणी मोडकळीस आली आहे. नाताळ सणामुळे शाळांना सुट्टी असते. त्यामुळे ‘चिल्ड्रन पार्क'मध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची वर्दळ असते. ‘सिडको'ने तात्काळ खेळणी दुरुस्त करावी, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे .

‘सिडको'ने लंडनमधील ‘हाईड पार्क'च्या धर्तीवर खारघर मध्ये सेंट्रल पार्क उद्यान उभारले आहेत. उद्यानात  भारतीय संस्कृतीची ओळख होईल अशाप्रकारे उद्यानाची रचना करण्यात आली आहे. उद्यानाच्या सुरुवातीलाच पखवाज, पेटी आणि इतर वाद्यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. तसेच कारंजे बसविण्यात आले होते. भारतीय संगीत कलेतील कथ्थक, भरतनाट्यम्‌ आणि इतर सर्व नृत्यांची ओळख व्हावी अशाप्रकारचे थीम पार्क तयार केले होते. तर एका बाजुला चिल्ड्रन पार्क उभारुन विविध प्रकारच्या खेळणी उपलब्ध करुन दिल्या होत्या.

मात्र, गेल्या ५ वर्षात ‘सिडको'ने ‘सेंट्रल पार्क'कडे दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण ‘सेंट्रल पार्क'ची दुरवस्था झाली आहे. ‘चिल्ड्रन पार्क'मधील खेळणी मोडकळीस आली आहे. त्यामुळे मुलांच्या आनंदावर विरजण पडत असल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यात आता १५ दिवसानी नाताळ सणामुळे  शाळांना सुट्टी पडणार आहे. सिडको प्रशासनाने चिल्ड्रन पार्क मधील खेळणी तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी पर्यटक वर्गाककडून केली जात आहे. या संदर्भात सिडको अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सेंट्रल पार्क विकसित केला जाणार असून लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.  

उद्यानात आवश्यक त्या ठिकाणी प्रशस्त फुडकोर्ट, प्रसाधनगृहांची रचना केली होती. परंतु, गेल्या २० वर्षांमध्ये एकही फुडकोर्ट सुरु होऊ शकले नाही. तलावामधील आणि आतमधील कारंजे बंद आहेत. ढोलकी, तबला यांच्या प्रतिकृतींची तोडफोड झाली आहे. नृत्याची माहिती देण्यासाठी उभारलेल्या कलाकारांच्या पुतळे गायब झाले असून ॲम्पी थिएटरचीही दुरवस्था झाली आहे.

सुट्टीच्या दिवशी विरुंगळा म्हणून मुलांसोबत ‘चिल्ड्रन पार्क'मध्ये आलो असता, सर्व खेळणी तुटल्याने मुलांना खेळता येत नसल्यामुळे माघारी फिरावे लागले. ‘सिडको'कडून ‘सेंट्रल पार्क'च्या देखरेखीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. याकडे ‘सिडको'च्या व्यवस्थापकीय संचालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
- गणेश बनकर, रहिवासी-स्पॅगेटी सोसायटी, खारघर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘क्रेडाई-बीएएनएम'च्या २४ व्या ‘नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो'ला सुरुवात