प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
‘माझी वसुंधरा ५.०'मध्ये नवी मुंबईचा डंका
नवी मुंबई : पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात नवी मुंबई महापालिकाने पुन्हा एकदा आपली मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण-वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये नवी मुंबई महापालिकेला १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ‘अमृत' शहरांच्या गटात राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान ५.०' १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील ४२२ नागरी स्थानिक संस्था आणि २७,८९५ ग्रामपंचायती अशा एकूण २८,३१७ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. यात नवी मुंबई महापालिकेने पंचतत्वांपैकी प्रत्येक तत्वाशी निगडीत थिमॅटिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये द्वितीय क्रमांकाचा बहुमान प्राप्त केलेला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन आणि फिल्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोन्ही मूल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे ‘माझी वसुंधरा अभियान ५.०' मधील राज्यातील सर्वोत्तम स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये नवी मुंबई महापालिकेने द्वितीय क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे.
या अभियानांतर्गत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या आधारे शहरांचे मूल्यमापन करण्यात आले. नवी मुंबईने या पाचही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेषतः भूमी संवर्धनासाठी केलेली वृक्षलागवड, कचऱ्याचे वर्गीकरण, हवेची गुणवत्ता राखण्यासाठी राबवलेली एसओपी आणि सौर ऊर्जेचा वापर या बाबींमुळे शहराने सदर यश संपादन केले आहे.
दरम्यान, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या यशाचे श्रेय जागरुक नवी मुंबईकर नागरिक, लोकप्रतिनिधी आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना दिले आहे. शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी नवी मुंबई यापुढेही आघाडीवर राहील, असा विश्वास आयुक्त डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.