वाशी : ऐरोली सेक्टर १८ येथील संजीवनी दीप दिव्यांग निवारा केंद्रात २८ एप्रिल रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने केंद्राचे मोठे नुकसान झाले. या आगीत दिव्यांग निवारा केंद्रात राहणाऱ्या १४ दिव्यांग बांधवांचे गाद्या, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे आणि जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले.याशिवाय दिव्यांगांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही व्हीलचेअर आगीत नष्ट झाल्या आहेत.
या घटनेमुळे दिव्यांग बांधवांवर मोठे संकट कोसळले असून, ऐरोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ऐरोली अग्निशामक दलाने वेळीच आग आटोक्यात आणली. परंतु, पुन्हा दुसऱ्या दिवशी २९ एप्रिल रोजी मध्यरात्री ३ वाजता पुन्हा आग लागल्याने दिव्यांग बांधवांचे होत्याचे नव्हते झाले आहे. रात्र आणि दिवसभर दिव्यांग बांधवांना सर्व कामे बाहेरच करावी लागली आहेत. त्यामध्ये त्यांचे किमान ४० लाखापेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे, असे अनुपम नेवगे यांनी सांगितले. सदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, संजीवनी दीप दिव्यांग निवारा केंद्रात लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीमुळे दिव्यांग बांधवांना तातडीच्या मदतीची गरज निर्माण झाली असून, समाजातील दानशूर व्यक्तींनी संजीवनी दीप दिव्यांग निवारा केंद्रातील दिव्यांगाना मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन अनुपम नेवगे यांनी केले आहे.