‘नवी मुंबई विमानतळ'ला एअरोड्रोम परवाना
नवी मुंबई : ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ'चे ८ ऑवटोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘नागरी विमान वाहतूक महासंचालनालय'ने (डीजीसीए) ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ'ला (एनएमआयए) एअरोड्रोम परवाना दिला आहे, अशी माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. (एनएमआयएएल) तर्फे ३० सप्टेंबर रोजी देण्यात आली आहे. ‘डीजीसीए'चा एअरोड्रम परवाना सर्व सुरक्षा आणि नियामक मानकांची पूर्तता केल्यानंतर विमानतळाला ऑपरेशन सुरु करण्याची परवानगी देतो.
‘नागरी विमान वाहतूक महासंचालनालय'चे महासंचालक फैज अहमद किडवाई यांनी ३० सप्टेंबर रोजी एअरोड्रोम परवाना सुपूर्द केला. यामुळे ‘नवी मुंबई विमानतळ' पूर्णपणे कार्यान्वि होण्याच्या दिशेने प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे ‘एनएमआयए'च्या प्रवक्त्याने सांगितले. नवी मुंबई विमानतळ मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे विमानतळ असेल.
‘डीजीसीए'कडून एअरोड्रोम परवाना मिळाल्याने ‘एनएमआयए'ने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कडक सुरक्षा आणि नियामक आवश्यकता पूर्ण केल्यानंतर दिलेला सदरचा परवाना, ऑपरेशन्स सुरूरु करण्यासाठी आवश्यक पूर्वअट आहे, असे ‘एनएमआयएएल'ने निवेदनात म्हटले आहे. एरोड्रोम परवाना आता लागू झाल्यामुळे, एनएमआयए प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या आणि नवी मुंबईला उर्वरित जगाशी जोडणारा आधुनिक प्रवेशद्वार स्थापित करण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाच्या जवळ जात आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
अदानी विमानतळ होल्डींग आणि सिडको यांच्या संयुक्त मालकीच्या ‘एनएमआयए'ने फेब्रुवारीच्या अखेरीस एअरोड्रोम परवान्यासाठी अर्ज केला होता. यानंतर किडवाई आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) प्रमुख विपीन कुमार यांनी मार्चमध्ये विमानतळाला भेट दिली. ‘डीजीसीए'ने सुरुवातीच्या अहवालात विमानतळाभोवती सुमारे २०० अडथळे सूचीबध्द केले होते, ज्यामध्ये उंच झाडे आणि सेल फोन ट्रान्समिशन टॉवर यांचा समावेश होता. सदर अडथळे परवाना देण्यापूर्वी दूर करणे आवश्यक होते. चाचणी उड्डाणे करणाऱ्या विमान वाहतूक नियामकानेही या पध्दतींमध्ये काही बदल करण्याची मागणी केली होती.
अदानी ग्रुप आणि सिडको पाच टप्प्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करीत आहे. नवी मुंबई विमानतळावरुन पहिल्या टप्प्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांना (एमपीपीए) सामावून घेण्याची आणि ०.५ दशलक्ष मेट्रीक टन (एमएमटी) मालवाहतूक करण्याची अपेक्षा आहे.
दुसरीकडे या वर्षाच्या सुरुवातीला इंडिगो आणि अकासा एअरच्या पाठोपाठ एअर इंडियाने गेल्या आठवड्यात नवीन विमानतळावरुन व्यावसायिक ऑपरेशन्स सुरु करण्याची योजना जाहीर केली आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, एअर इंडिया एक्सप्रेस - एअर इंडियाची कमी वाहक - १५ भारतीय शहरांना जोडणारी २० दैनंदिन उड्डाणे चालवणार आहे. २०२६ रोजीच्या मध्यापर्यंत ५ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह ५५ दैनंदिन उड्डाणे वाढवण्याची एअरलाईन्सची योजना असून २०२६ च्या हिवाळ्यापर्यंत ६० दैनंदिन उड्डाणे गाठण्याचे उद्दिष्ट ‘एआर इंडिया एवस्प्रेस'ने निश्चित केले आहे