जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर
मुंबईः राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे. ‘राज्य निवडणूक आयोग'ने या निवडणुकीची घोषणा १३ जानेवारी रोजी पत्रकार परिषदद्वारे केली. न्यायालयाच्या आदेशाला अधिन राहून ५० टक्के आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये आणि पंचायत समित्यांमध्ये निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व मतदान ईव्हीएमवर घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. ३ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे.
पुणे, सातारा, सांगली, संभाजीनगर, परभणी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सोलापूर, धाराशीव, लातूर या जिल्हा परिषदांसाठी निवडणूक होणार आहे. याकरिता जवळपास २५ हजार मतदान केंद्र असतील. प्रचार मतदानाच्या २४ तास आधी थांबेल. १३ जानेवारीपासून आचारसंहिता लागू झाल्याचे ‘निवडणूक आयोग'ने स्पष्ट केले आहे. ‘जिल्हा परिषद'करिता ९ लाख रुपये, पंचायत समितीसाठी ६ लाख रुपये उमेदवारांना खर्च करता येणार आहे. निवडणूक खर्चाची मर्यादा आयोगाने जाहीर केली आहे.
या निवडणुकांसाठी एकूण मतदार २ कोटी ९ लाख आहेत. यात स्त्री आणि पुरुष मतदार तसेच इतर यांचा समावेश आहे. ७३१ सदस्य ‘जिल्हा परिषद'ेसाठी निवडून द्यायचे आहेत. तसेच १४६२ पंचायत समिती सदस्य निवडून द्यायचे आहेत.
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमः
१६ जानेवारी प्रसिद्धी
नामनिर्देशन पत्र स्विकारणे : १६ जानेवारी ते २१ जानेवारी, २०२६
नामनिर्शेन पत्राची छाननी ः २२ जानेवारी
उमेदवारी माघारी ः २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत
अंतिम उमेदवारीची यादी
निवडणूक चिन्ह वाटप : २७ जानेवारी दुपारी ३.३० नंतर
मतदान : ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यत
मतमोजणी ः ७ फेब्रुवारी सकाळी १० वाजल्यापासून.