प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
शेलारपाड्यातील कचऱ्याची समस्या ‘जैसे थे'
कल्याण: श्री मलंगगड परिसरातील शेलारपाडा येथील कचरा प्रकल्पाचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रुप धारण करत आहे. मानवी वस्ती आणि शाळेजवळ असलेल्या या प्रकल्पाचा रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, वारंवार तक्रारी करुनही प्रशासन ढिम्म असल्याचे सांगत आता स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात आमरण उपोषणाचा पवित्रा घ्ोतला आहे.शेलारपाडा गावातील या घनकचरा प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे सदर प्रकल्प मानवी वस्तीला लागूनच असल्याने आणि जवळच शाळा असल्याने लहान मुलांच्या आरोग्यावर याचे विपरीत परिणाम होत आहेत. दुर्गंधीमुळे चिमुकल्यांना श्वसनाचे आजार जडत असल्याने पालकांमध्ये भिती आणि चिंतेचे वातावरण आहे.
अंबरनाथ तहसीलदारांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करुन गटविकास अधिकाऱ्यांना सूचना करीत सर्वेक्षण अहवाल मागवला होता. मात्र, प्रशासकीय पातळीवर केवळ कागदी घोडे नाचवले जात असून प्रत्यक्ष कारवाई शून्य असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. आम्ही कित्येक वर्षांपासून या नरकयातना सोसत आहोत. प्रशासन आमच्या जीवाशी खेळत आहे. आता ठोस कारवाई झाल्याशिवाय आणि सदर प्रकल्प बंद झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. लवकरच आम्ही आमरण उपोषण सुरु करणार आहोत. उपोषण करुनही कार्यवाही झाली नाही तर आमच्या मुलांना कचरा प्रकल्पावर सोडून देऊ, अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी देत आहेत.
कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी नेहमीच भटक्या श्वानांचा वावर असतो. गेल्या काही दिवसात या हिंस्त्र श्वानांनी अनेक लहान मुले आणि नागरिकांना चावा घ्ोतल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रारमाध्यमांनी देखील यापूर्वीही या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र अद्याप परिस्थितीत कोणताही सुधार झालेला नाही. हा कचरा प्रकल्प तातडीने बंद करावा, या मागणीसाठी ग्रामस्थ आता ‘आरपार'च्या लढाईच्या तयारीत आहेत. प्रशासन गावकऱ्यांची या जाचातून मुक्तता करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साधारणपणे महिन्याभरापूर्वी अंबरनाथ तहसीलदारांमार्फत पाहणी करुन गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या सुचनेनंतर गटविकास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केलेली आहे. पाहणी दरम्यान या प्रकरणी कायदेशीर कागदोपत्री प्रक्रिया सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय घ्ोतला जाईल, असे गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी सांगितले.