प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
जमिनीच्या वादातून पर्यावरणाचा ऱ्हास
भिवंडीः भिवंडी तालुक्यातील मौजे धामणगाव येथे विकलेली जमीन पुन्हा बेकायदेशीरपणे बळकावण्याच्या उद्देशाने जमिनीवरील मौल्यवान झाडांची कत्तल केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जमीन मालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्यासह नैसर्गिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप असून, भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात २ जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौजे धामणगाव येथील सर्व्हे नं.८९/१ (खाते नं.६२४) शेतजमीन हौसाबाई गणेश थळे यांच्या मालकीची आहे. सदर जमीन त्यांनी काही वर्षांपूर्वी रंगनाथ शांताराम भोईर आणि शांताराम पदू भोईर (दोघेही रा. कशिवली, भिवंडी) यांच्याकडून खरेदी केली होती. मात्र, सध्या या भागातील जमिनींचे भाव गगनाला भिडल्याने, सदर जमीन पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न मूळ मालकांकडून सुरु झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
हौसाबाई थळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगनाथ आणि शांताराम भोईर यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह या जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले. केवळ अतिक्रमण करुन ते थांबले नाहीत, तर त्यांनी या जमिनीवर असलेली ‘सफेद ऐन' यासारखी अनेक मौल्यवान आणि अनुसूचित झाडे तोडून त्यांची जाळपोळ केली. जमिनीवरील ताबा दर्शवण्यासाठी सदर प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भरत भोईर (५१) यांनी यासंदर्भात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी रंगनाथ भोईर आणि शांताराम भोईर यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. दुसरीकडे हौसाबाई थळे यांनी पडघा वन विभागाकडे धाव घेऊन लेखी तक्रार केली आहे.
बेकायदेशीरपणे कापलेली वनसंपत्ती तात्काळ जप्त करुन शासन जमा करावी. या घटनेचा अधिकृत पंचनामा करुन दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी. वन संवर्धन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधितांना दंड करावा, अशा मागण्या थळे यांनी तक्रार अर्जात केल्या आहेत.
पोलिसांनी सदर प्रकरणाची नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे. मात्र, वन विभागाकडून या प्रकरणावर काय कारवाई होते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जमिनीचे भाव वाढल्यामुळे अशा प्रकारे गुंडगिरी करुन सर्वसामान्यांच्या जमिनी बळकावणे आणि पर्यावरणाचे नुकसान करणे चुकीचे असून, आम्हाला न्याय मिळावा, अशी भावना थळे कुटुंबाने व्यक्त केली आहे.