प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
‘केडीएमसी'चा ३१८६ कोटींचा अर्थसंकल्प सादर
कल्याण : कोणतीही कर आणि दर वाढ नसलेले कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सन २०२५-२६ चे २७४४.९९ कोटी रुपये जमा आणि २१७२.२२ कोटी रुपये खर्चाचे सुधारित अंदाजपत्रक आणि ३१८६.४९ कोटी खर्चाचे आणि रक्कम ३१८६.६० कोटी रुपये जमा रक्कमेचे आणि १०.५१ लक्ष रुपये शिल्लक रक्कमेचे सन २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महासभेस सादर केले. यावेळी महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, महापालिका सचिव किशोर शेळके, महापालिका मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे, मुख्य लेखा-वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे उपस्थित होते.
या अंदाजपत्रकात सन २०२६-२७ या वर्षात मालमत्ता करापोटी ६००.०१ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असून शासनाकडून जीएसटी अनुदान आणि मुद्रांक शुल्का पोटी रक्कम ५१०.०३ कोटी अनुदान अपेक्षित आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वसुली पोटी रक्कम १०१ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असून शासकीय अनुदाने आणि अंशदाने अंतर्गत शिक्षण वेतन अनुदानासह ११५.०६ कोटी रुपये अनुदान अपेक्षित आहे. विशेष अधिनियमाखाली वसुली ५२६.३० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून २८.८५ कोटी संकिर्ण उत्पन्न अपेक्षित आहे.
यामध्ये येत्या आर्थिक वर्षाकरिता ८२९.२५ कोटी अनुदान अपेक्षित आहे. सन २०२६-२७ वर्षात १६५४.०८ कोटी रुपये महसुली खर्च आणि १५२४.२० कोटी रुपये भांडवली खर्च अपेक्षित आहे. महापालिका निधीतून मोठा गांव रेल्वे फाटकाच्या ठिकाणी महापालिकेने रेल्वे उड्डाणपुल प्रस्तावित केला आहे. डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपुल वाहतुकीस अपुरा पडत असल्याने, सदर ठिकाणी नवीन दोन पदरी अतिरिक्त उड्डाणपुल बांधण्याचे प्रस्तावित आहे. विकास योजनेअंतर्गत सावित्रीबाई फुले कलामंदिराचे आधुनिकीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. कल्याण पश्चिम भागात आगरी, कोळी, कुणबी, वारकरी सांस्कृतिक भवन, बारावे येथील आरक्षित भूखंडावर डॉ.आनंदीबाई जोशी उद्यान, सुभाष मैदान येथील स्टेडियम अशी कामे लवकरच सुरु करण्यात येत आहेत. महापालिकेच्या फंडातून आधारवाडी, लालचौकी, कल्याण (पश्चिम), बैलबाजार कल्याण (पश्चिम), मुरबाडा रोड कल्याण (पश्चिम), वि्ीलवाडी कल्याण (पूर्व), थारवाणी कॉम्प्लेक्स जवळ टिटवाला (पश्चिम), मोक्षधाम स्मशानभूमी डोंबिवली (पूर्व), पाथर्ली डोंबिवली (पूर्व), कोळेगाव डोंबिवली (पूर्व) येथे स्मशानभूमी पुनर्विकासाचे काम सुरु करण्यात आले आहे. तर, मुलभूत सुविधाअंतर्गत कॅसारिओ डोंबिवली (पूर्व) आणि माणेरे येथे स्मशानभूमीचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रातील उद्याने आणि मैदाने येथे सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्याचे प्रस्तावित आहे. मौजे बारावे येथे सुसज्ज बगीचा विकसीत करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. या उद्यानात ऑटीझम व्हिलेज संकल्पना राबविण्यात आली आहे. तसेच १५ लहान उद्याने, कल्याण (पश्चिम) वसंत व्हॅली परिसरात, डॉ.आनंदीबाई जोशी उद्यान आणि भोपर टेकडी सुशोभिकरण प्रस्तावित आहे. अमृत ग्रीन स्पेस अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानातून २ वृक्ष छाटणी वाहने खरेदी करणे आणि ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग युनिट उभारणे प्रस्तावित आहे. पाणी पुरवठ्याचे डीजीटलायझेशन करण्यात येणार असून यात पलो मीटर, स्काडा आणि डिजिटल टि्वन सॉपटवेअरद्वारे पाणी नियंत्रण केले जाणार आहे.
डोंबिवली येथे भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. घनकचरा व्यवस्थापनकरिता प्रक्रिया क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत. यामध्ये उंबर्डे येथे एमएमआरडीए मार्फत DBFOT तत्वावर ७५० टीपीडी क्षमतेचा (वेस्ट टु एनर्जी) कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारणे. बारावे येथील भारत पेट्रोलियम मार्फत २०० टीपीडी क्षमतेचा बायो सीएनजी प्रकल्प उभारणे. कल्याण पश्चिम बारावे येथील ३५ टीपीडी बायो सीएनजी प्लँटचे पुनर्वसन करुन ६० टीपीडी करणे. हॉर्टीकल्चर वेस्ट करिता बारावे येथे ब्रिकेटींग प्लॅन्ट उभारणे.
खुल्या बाजारातून भांडवल उभारणी अंतर्गत महापालिकेचे विशेष महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २०० कोटीचे कर्ज रोखे (महापालिका बॉन्ड) उभारणी करणे प्रस्तावित असून, त्यातून प्राप्त होणाऱ्या रक्कमेतून निधी उभारुन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. विकास प्रस्तावांच्या माध्यमातून विकास शुल्क, अतिरिवत एफएसआयसाठी प्रिमीयम आणि इतर माध्यमातून एकूण २४१ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त करण्याचे महापालिकेचे उद्दीष्ट असून, स्मार्ट पार्किंग आणि जाहिरातीच्या निविदांद्वारे अंदाजे २० ते २५ कोटी वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे. तसेच मालमत्ता विभागातून महापालिकेच्या बांधीव मिळकतींचे भाडे जाहिराती आणि अन्य उत्पन्नाद्वारे ४८ कोटींचा महसूल अपेक्षित धरण्यात आला आहे.