ठाणे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी -ना. प्रताप सरनाईक
ठाणे : मौजे भाईंदरपाडा (गायमुख) येथील ठाणे महापालिकेच्या जागेवर विकसित होत असलेल्या एरोबिक्स स्वयंचलित बायो कंपोस्टींग मशीनद्वारे ओल्या कचऱ्यापासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प राज्यात पथदर्शी ठरेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
ठाणे महापालिका हद्दीतील विकास कामांच्या पाहणी दौऱ्यावेळी ना. प्रताप सरनाईक बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मौजे भाईंदरपाडा येथे ठाणे महापालिकेचे सुमारे ४१९० चौ.मी. क्षेत्र घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. सध्या या जागेतील १/३ जागेवर ९० ते १०० टनांपर्यंत प्राप्त झालेल्या ओल्या कचऱ्यापासून पासून एरोबिक्स स्वयंचलित बायो कंपोस्टींग मशीनद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपोस्ट खतांची निर्मिती प्रकल्प सुरु आहे. उर्वरित जागेवर सदर प्रकल्प विस्तारित करण्यात येणार असून सुमारे ३०० टनांपर्यंतचा घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश ना. सरनाईक यांनी यावेळी दिले.
सदर पाहणी दौऱ्यात ना. प्रताप सरनाईक यांनी स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे यथोचित स्मारक विकसित होत असलेल्या नांगला बंदराची देखील पाहणी केली. तसेच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्या आणि विस्थापितांच्या योग्य पुनर्वसन संदर्भात सूचनाही केल्या.
लाहस् ग्रीन इंडिया प्रा. लि. सोलराईज कंट्रोल विन्ड्रो कम्पोस्टींग टेवनॉलॉजी द्वारे (आय.आय.टी. मुंबई पेटंट) अशा प्रकारे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प राबविणारी ठाणे महापालिका देशातील पहिलीच महापालिका ठरणार आहे. या जोडीला एर्न्वारो इन्वेन्ट सिस्टीम प्रा. लि. या कंपनीने बनविलेले ट्रिटमेंट ऑफ द वेस्ट ऑन द गो वाहनाद्वारे जागेवर एकावेळी सुमारे २ टन ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्यात येते, अशी अजून २० वाहने लवकरच उपलब्ध होणार आहेत.
कान्होजी आंग्रे स्मारक प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या प्रत्येक आगरी-कोळी कुटुंबांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करण्यात यावे. महापालिका क्षेत्रातील विकास कामाला अडथळा ठरणाऱ्या अन्य जागेवरील अतिक्रमण निर्मुलन अधिकाऱ्यांनी तातडीने करुन घ्यावे.
-ना. प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य.