‘नमुंमपा'ची मंत्रालयाला दिलेली वाहने परत बोलविण्याची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीची वाहने मंत्रालयातील नगरविकास खात्यातील कक्ष अधिकारी, अवर सचिव, उप सचिव यांनी अनाधिकाराने वापरलेल्या वाहनांवरील इंधन आणि देखभाल-दुरुस्तीवरील खर्चाची रक्कम मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडून सव्याज वसूल करुन महापालिकेकडे वर्ग करण्याची मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका कडील वाहने मंत्रालयातील कक्ष अधिकारी, अवर सचिव, उप सचिव यांनी अनाधिकाराने वापरलेली आहेत. सदर अधिकाऱ्यांना शासनाच्या प्रचलित नियमानुसार वाहन अनुज्ञेय नाही. तरीही सदर अधिकाऱ्यांनी केवळ नगरविकास विभागामध्ये कार्यरत असल्याचा गैरफायदा घेऊन महापालिकेकडील वाहने उपलब्ध करुन घेतलेली आहे. नमुंमपा हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या करातून जमा झालेल्या रवकमेतून या वाहनांवर खर्च करण्यात आलेला आहे. त्यामुळे सदरचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून व्याजासहित वसूल करुन वाहने नवी मुंबई महापालिकेकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.
महापालिकेची वाहने नवी मुंबईकरांच्या करातून खरेदी करण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारचा ठराव न घेता महापालिका प्रशासनाने कोणाला विचारुन सदर वाहने मंत्रालयीन अधिकाऱ्यांना वापरासाठी दिलेली आहे. त्याचा इंधन खर्च, देखभाल खर्च याचा भुर्दंड महापालिका प्रशासनाने पर्यायाने नवी मुंबईकरांनी का सहन करायचा? मंत्रालयात झालेल्या वाहनांवरील आतापर्यंत सर्व खर्च मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा.
-रविंद्र सावंत, प्रववते-नवी मुंबई जिल्हा काँग्रेस.