ओवे डोंगरावर ७ वर्षांनी कारवी फुलांचा बहर
खारघर : ७ ते ८ वर्षांनी एकदा उमलणाऱ्या कारवी फुलांनी खारघर मधील ओवे डोंगर बहरला आहे. या फुलांमधे भरपूर पराग आणि मकर मिळत असल्यामुळे मधमाश्या या बहराच्या वेळी कारवी फुलांच्या जाळीवरच डेरा देऊन बसत असल्याचे चित्र दिसते.
पश्चिम घाटातील सखल टेकड्यांवर तसेच कास पठारावर आढळणाऱ्या कारवी तसेच इतर फुलांचा मनमोहक आनंद लुटण्यासाठी पर्यावरण प्रेमी मोठ्या प्रमाणात जात असतात. मात्र, सह्याद्री पर्वतरांगा म्हणून ओळखला जाणारा खारघर डोंगर विविध रंगीबेरंगी रान फुलांनी नटलेला आहे. विशेष तळोजा मध्यवर्ती कारागृह शेजारी असलेल्या ओवे डोंगर ७ वर्षांनी एकदा उमलणाऱ्या जांभळ्या रंगाच्या टपोरी कारवी फुलांनी बहरला आहे. याशिवाय हिरव्यागार गवतांच्या झाडाझुडपात बहरलेली लाल, पिवळी, गुलाबी, निळी, जांभळी, पांढरी रंगाची फुले आणि त्या फुलांवर मुक्तपणे बागडणारी फुलपाखरे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
विविध फुलांच्या अनुभवासाठी निसर्ग आणि पर्यावरण प्रेमी कास पठारावर जातात. मात्र, ओवे डोंगर कारवी तसेच विविध रानफुलांनी बहरला आहे. विशेष म्हणजे कारवी फुले दर ७ ते ८ वर्षांनी बहरतात. खारघर मधील नागरिकांना कारवी आणि इतर रान फुले, फुलपाखरांचा आनंद घेता येणार आहे. - ज्योती नाडकर्णी, पक्षी आणि पर्यावरण प्रेमी - खारघर.
खारघर डोंगरावर जंगली फुलांच्या इतरही अनेक प्रजाती आहेत. विशेष म्हणजे सेरोपेजिया आणि सनड्यू दुर्मिळ वनस्पती डोगरावर बहरल्या आहेत. २०१६ नंतर यावर्षी कारवी फुलांनी ओवे डोंगर बहरला आहे. राज्यकर्ते आणि स्थानिक प्रशासनाने जैवविविधतेला आधार देण्यासाठी बेकायदेशीरपणे खारघर, ओवे डोंगराच्या पायथाशी होणारे खोदकाम आणि खाणकाम थांबविण्याची गरज आहे, असे पर्यावरण प्रेमीनी सांगितले.