‘धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुल'चे ना. सरनाईक यांच्या हस्ते भूमीपुजन

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने बोरिवडे मैदान, कासारवडवली येथे आरक्षणे आणि सुविधा भूखंड विकसित करण्याच्या कार्यक्रमांतर्गत बांधण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचे भूमीपुजन नुकतेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

घोडबंदर रोड प्रभाग क्र.१ मधील आरक्षणे आणि सुविधा भूखंड विकसित करण्याकरिता ‘महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास' या योजना अंतर्गत राज्य सरकारकडून ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून बोरीवडे मैदान विकसित करुन धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. या क्रीडा संकुलाचा फायदा परिसरातील सर्व खेळाडूंना होणार आहे. त्यामुळे सदरचा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असल्याचे प्रतिपादन ना. प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.

या भूमीपुजन सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेविका साधना जोशी, माजी नगरसेवक पूर्वेेश सरनाईक, कार्यकारी अभियंता संजय कदम, उपअभियंता बी. व्ही. गव्हाणे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोरीवडे मैदान आरक्षित भूखंडाचे क्षेत्रफळ ८४,९७४ चौरस मीटर असून त्यापैकी ६,८१९ चौरस मीटर क्षेत्रफळावर जिमखाना बांधण्यात येणार आहे. या जिमखान्यामध्ये विविध प्रकारच्या खेळांसाठी सुविधा असणार आहेत. त्यात बॅडमिंटन कोर्ट, क्रिकेट प्रॅक्टिस नेट, कुस्ती, उपहारगृह आदि सुविधा असतील. तर मल्लखांब, कबड्डी, हुतुतू, लाल मातीची कुस्ती, बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, स्केटींग ट्रॅक या मैदानी खेळांचाही समावेश आहे. तसेच मैदानाचे पूर्णपणे सपाटीकरण करणे, संरक्षक भिंत आणि आकर्षक प्रवेशद्वार या कामांचाही प्रकल्पात समावेश आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘एनएमएमटी'तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन स्मार्टकार्ड योजना