झाडे वाचविण्यासाठी भाजप राष्ट्रवादी आमनेसामने
नवी मुंबई -: नवी मुंबई शहरातील पाम बीच मार्गावर ३५०.कोटी रुपये खर्चून उड्डाण पूल बनवला जाणार आहे. या उड्डाण पूल निर्मिती मध्ये सुमारे ३९० पूर्ण वाढ झालेली झाडे तोडली जात असल्याने आमदार गणेश नाईक व आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजपने रस्त्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुमारे तीन तास रस्त्यावर आंदोलन केले. मात्र याच मुद्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वखाली राष्ट्रवादीने देखील आंदोन केले .मात्र सत्ताधारी आणि विरोधकांनी एकाच मुद्द्यावर आंदोलन करत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला ऊत आला आहे.
वाशी येथे पाम बीच मार्गावर कोपरी पर्यंत ३५० कोटी रुपये खर्चून उड्डाण पुल बनविण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांच्या दबावाखाली मनपा प्रशासन गरज नसताना पुल निर्माण करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी केला. या उड्डाणपुलासाठी ३९० झाडे तोडली जाणार असल्याने याला विरोध करण्यात आला.ठाणे येथील नेत्यांकडे मनपाची प्रशासकीय सूत्रे असल्याने जितेंद्र आव्हाड यांनी आधीच नाराजी व्यक्त केली होती. झाडांचा आंदोलनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झाडांसाठी पर्यावरण दिनाच औचित्य साधून पाम बीच मार्गावर आंदोलन केले.याच रस्त्यावर आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली ते वाशी लाँग मार्च फेरी काढून महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढले. हजारोंच्या संख्येने या फेरीत नागरिकांनी सहभाग घेतल्याने झाडांच्या निमित्ताने आता राजकीय घटना वेगाने घडत आहेत. महाविद्यालयीन तरुणांनी या आंदोलनात सहभाग घेतला. रस्त्याच्या एका बाजूला भाजप तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी एकाच मुद्द्यावर आंदोलन करत असल्याने विरोधक सत्ताधारी एकत्रित आंदोलन करत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. जितेंद्र आव्हाड यांचा वाहनांचा ताफा भाजपच्या व्यासपीठा जवळूनच गेल्याने काही काळासाठी आंदोलनाचे चित्र पालटले होते.
भाजपच्या आशिष शेलार यांनी पर्यावरण व वातावरण बदलीय मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वर टीका करत त्यांचे पर्यावरण प्रेम बेगडी असल्याची टीका केली. मुंबई मध्ये सोळा हजार झाडांची कत्तल करत असताना आता नवी मुंबई शहरातील झाडे कापली जात असल्याबद्दल शेलार यांनी टीका केली आहे. तर सत्तेसाठी लबाड लोकांच्या बरोबर राष्ट्रवादी असून आधी सत्तेमधून बाहेर पडा मगच चीपको आंदोलन करा असा सल्ला आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.
उड्डाण पुलाच्या ठराव गणेश नाईक यांच्या काळात मंजूर केला आणि आम्ही आंदोलन करत असताना त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. शरद पवार बाळासाहेब ठाकरे यांचे होऊ शकले नाही ते गणेश नाईक कोणाचे होणार नाही. प्रशासकीय राजवटीत आयुक्तांनी आताच हा ठराव बाहेर का काढला अशी टीकाही आव्हाड यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्यावर केल्याने आता हा झाडांचा मुद्दा चांगलाच पेटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मनपाच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यावर आता भाजप आणि राष्ट्रवादीने या आंदोलनाच्या निमित्ताने आपली शक्ती दाखवून देत सध्या तरी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.औद्योगिक परिसरात तीन हजार झाडे तर पाम बीच मार्गावर ३९० झाडे तोडली जाणार असल्याने भाजप मार्फत आंदोलनाची भूमिका घेतल्यावर आम्ही आधी आंदोलन करणार त्याआधीच भाजप रस्त्यावर उतरल्याची टीका आता राष्ट्रवादी करत आहे. तर सत्तेसाठी लबाड लोकांच्या बरोबर राष्ट्रवादी असून आधी सत्तेमधून बाहेर पडा मगच चीपको आंदोलन करा असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे. त्यामुळे झाडांच्या आंदोलनाने ऐन पावसाच्या तोंडावर नवी मुंबईतील राजकारण चांगलेच तापले आहे.