१४ गावांतील जिल्हा परिषद शाळांचा लवकरच कायापालट
वाशी : नव्याने नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या कल्याण तालुवयातील दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नेवाली, भांडर्ली, पिंपरी गाव, गोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळण, बाळे आणि दहिसर मोरी या १४ गावातील नागरी सुविधा कामांना आता सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात येथील शाळांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने तूर्तास या १४ गावांतील ४ जिल्हा परिषद शाळांच्या देखभाल-दुरुस्ती कामाच्या निविदा नवी मुंबई महापालिका तर्फे काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच येथील शाळा कात टाकणार आहेत.
कल्याण तालुक्यातील १४ गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट केल्यानंतर या गावांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यात आल्या नसल्याने या गावांमध्ये पायाभूत सुविधा तत्काल पुरवून त्यात आरोग्य, शिक्षण, पाणी या रस्त्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.केलास शिंदे यांना गेल्या सप्टेंबर महिन्यात दिले होते. नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट कल्याण तालुवयातील दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नेवाली, भांडर्ली, पिंपरी गाव, गोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळण, बाळे आणि दहिसर मोरी या १४ गावांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शाळा या कामांना ताताडीने प्राधान्य द्यावे, या गावांतील दप्तर हस्तांतरणाची कार्यवाही त्वरीत पूर्ण करावी, १४ गावांमध्ये तातडीने मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने कार्यवाहीला वेग द्यावा, तात्पुरती आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पोर्ट कॅबिनच्या सहाय्याने दवाखाने सुरु करण्यात यावे, असे निर्देश देखील ना. एकनाथ शिंदे यांनी दिले होते.त्यानंतर नवी मुंबई महापालिका स्थापत्य विभाग कामाला लागला असून, पहिल्या टप्प्यात शाळा सुधारण्यावर महापालिका तर्फे जोर देण्यात आला आहे. त्यानुसार कल्याण तालुवयातील दहिसर ठाकूर पाडा, वाकलन, निगू आणि नारिवली या ४ गावांतील जिल्हा परिषद शाळांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा नवी मुंबई महापालिका स्थापत्य विभागाने काढल्या आहेत.त्यामुळे लवकरच दहिसर ठाकूर पाडा, वाकलन, निगू आणि नारिवली या गावांतील शाळा कात टाकणार असून, नागरी सुविधांची निकड पाहून पुढील काळात त्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका अभियंत्यांनी दिली.