वाशी गांव मधील नागरिक दैनंदिन बाजार पासून वंचित
नवी मुंबई : सिडको प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या संकुचित वृत्तीमुळेच गेल्या अनेक वर्षांपासून वाशीगाव आणि वाशी सेक्टर-३१ परिसरातील नागरिकांना भाजी, मासळी आणि अन्य दैनंदिन बाजारासाठी राखीव असलेल्या मार्केटच्या भूखंडाचे ‘सिडको'ने नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत केलेले नाही. त्यामुळे वाशीगांव येथील मच्छी (दैनंदिन) मार्केटचा एकूण ५०० चौ.मी.क्षेत्रफळाचा राखीव भूखंड सिडकोने नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करावा अन्यथा सुसज्ज मार्केट आणि सामाजिक सेवा उपयोगासाठी वास्तू निर्माण करुन द्यावी, अशी जनहितार्थ मागणी नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आणि स्थानिक माजी नगरसेविका फशीबाई करसन भगत यांनी पुन्हा एकदा पत्राद्वारे सिडको प्रशासनाकडे केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासुन तत्कालीन नगरसेवक काळात दशरथ भगत यांनी अनेक पत्राद्वारे सिडको आणि महापालिका प्रशासनाकडे वाशी गाव मध्ये मार्केटसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर दैनंदिन बाजारासाठी मार्केटच्या वास्तुसह सामाजिक उपयोजन होईल अशी बहुउद्देशीय वास्तू निर्माण करावी, अशी मागणी लावून धरलेली आहे. मात्र, सिडको प्रशासनाच्या आकसामुळे वाशी गावातील दैनंदिन बाजाराचा प्रश्न अधांतरीत राहिला आहे, असा आरोप दशरथ भगत यांनी सिडको विरोधात पुन्हा एकदा केला आहे.
जानेवारी- २०२२ मध्ये महापालिकेच्या नवी मुंबई शहर विकास आराखड्यात देखील सदरच्या भूखंडावर मार्केट उभारावे, असे नमूद करण्यात आले आहे. याचा अंतर्भाव नगरविकास विभागाने केला आहे. राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांनी देखील सिडको व्यवस्थापकीय संचालक आणि महापालिका आयुक्त यांना सदर भूखंडाबाबत तात्काळ निर्णय घेऊन नागरिकांना सामाजिक सेवा देण्यात कसूर करू नये असे निर्देश यापूर्वीच लेखी आणि तोंडी अशा दोन्ही स्वरुपात दिलेले आहेत.
सदर राखीव भूखंड ठिकाणी असलेल्या एकूण ४ भूखंडांच्या ५०० चौ. मी. भूखंडांवरील ३०० चौ. मी. क्षेत्रफळावर विद्युत ट्रान्सफार्मर उभारणीसाठी आरक्षण होते. मात्र, त्यासाठी नगरसेवक म्हणून दशरथ भगत यांनी त्यांच्या कार्यकाळात याच परिसरात अन्य दोन ठिकाणच्या भूखंडांवर ‘एमएसईबी' प्रशासनाला भूखंड उपलब्ध करुन देऊन त्याठिकाणी वीज ट्रान्सफार्मर स्थापित करुन दिल्याने विद्युत ट्रान्सफार्मरच्या जागेचा विषय निकालात निघालेला आहे. याबाबतीत महापालिकेने तशी वस्तुस्थिती आणि असलेला एकूण आवश्यक ५०० चौ. मी. क्षेत्रफळ आकारमानाचा भूखंड मार्केट आणि बहुद्देशीय इमारतीच्या उभारणीसाठी हस्तांतरीत करावा, अशी मागणी सिडकोकडे आपण अनेकदा केलेली आहे. मात्र, संकुचित सिडको आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या अंतर्गत समन्वयाच्या अभावामुळे याठिकाणी दैनंदिन मार्केट आणि सामाजिक वापरासाठी बहुउद्देशीय अशी वास्तू उभी राहिली नाही वाशी गाव मध्ये दैनंदिन मार्केट आणि सामाजिक वापरासाठी बहुउद्देशीय वास्तू आता ‘सिडको'नेच उभारावी अन्यथा सदरचे ५०० चौ. मीटर चे भूखंड सामाजिक सेवेसाठी त्वरेने महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडे हस्तांतरीत करावा अशी मागणी पुन्हा एकदा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून दशरथ भगत आणि फशीबाई करसन भगत यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे.