नवी मुंबईतील विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय ऐक्य संदेश प्रसारण

नवी मुंबई : ‘हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी निमित्त नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रभातफेरी, निबंध, चित्रकला, वक्तृत्व, घोषवाक्य असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. यासोबतच सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये सुप्रसिध्द गायक सतिंदर सरताज यांचे समर्पित भक्तीगीत श्रवण आणि डॉक्युमेंटरी मधून श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचे तेजोमयी जीवनचरित्र दर्शन असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

या अंतर्गत १० फेब्रुवारीपासून विविध उपक्रम राबविण्यास सुरूवात झालेली असून १४ फेब्रुवारी रोजी नमुंमपा शाळा क्र.४९ ऐरोलीगाव तसेच पीएम श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र.५५ आंबेडकरनगर रबाले याठिकाणी ‘हिंद-दी-चादर' चरित्रपट प्रदर्शित करण्यात आला. तसेच सतिंदर सरताज यांनी गायलेले सुश्राव्य भक्तीगीतही प्रदर्शित करण्यात आले. ऐरोली शाळेमध्ये बाबा विक्रमजितसिंग, तेजिंदरसिंग, मुखविंदरसिंग, दारासिंग, जसपाल सिंग या मान्यवरांनी उपस्थित राहून गुरुंच्या कार्याची महती सांगितली. तसेच शहिदी समागम कार्यक्रमाचे महत्व विद्यार्थ्यांना कथन केले.

नमुंमपा कुकशेतगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी परिसरात प्रभातफेरी काढून घोषणांद्वारे तसेच घोषणा फलकांद्वारे कार्यक्रमाचे महत्व जनमानसात प्रसारित केले. नेरूळ पश्चिम येथील नमुंमपा शाळा क्र.९, सेक्टर-१५ कोपरखैरणे येथील अस्मिता विशेष शाळा, सेक्टर-३ ऐरोली येथील श्रीराम विद्यालय, तुर्भ स्टोअर येथील शाळा याठिकाणी आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेतला.

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित निबंध स्पर्धा यशस्वीरितीने संपन्न झाली. तसेच रा. फ. नाईक विद्यालय खैरणे, तुर्भे स्टोअर शाळा आणि गुरू गोविंदसिंह एज्युकेशन ॲकॅडमी नेरुळ याठिकाणी आयोजित निबंध स्पर्धेतही विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले. एसजी पब्लिक स्कुल घणसोली यांनी घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्येही विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग मिळाला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण तत्पर - जिल्हा-सत्र न्यायाधीश सावंत