७ वर्षीय जलतरणपटू रेयांश खामकरच्या विक्रमाची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद
ठाणे : ठाणेमधील अवघ्या ७ वर्षांच्या रियांश सानिका दीपक खामकर याने अरबी समुद्रात ३० कि.मी. एकट्याने पोहून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी ७ तास ३० मिनिटे ११ सेकंदांत सदर अंतर पोहून पूर्ण केलेल्या त्याच्या पराक्रमाची नोंद लंडन ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये झाली आहे.
रियांश खामकर ‘स्टारफिश स्पोटर्स फाऊंडेशन'चे प्रशिक्षक कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे घेत असून ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे नियमित सराव करीत आहे. रेयांशच्या या यशामुळे ठाणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे सत्काराप्रसंगी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले.
यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते गोवा येथे हवाई बीच ते हवाई वेल्हा बीच येथे २६ जानेवारी २०२६ रोजी १० कि.मी. सागरी अंतर पार केलेले जलतरणपटू आयुषी आखाडे, सुयश हिंदळेकर, ध्रिती कोळी, समिप्ता व्हावळ, रेयांश खामकर, ओजस मोरे, गार्गी भरणुके, सिध्द मुपेनेट्टी, विवान गुरसुळे, समर्थ भिलारे यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच जलतरणपटुंचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांचाही सन्मान करण्यात आला
यापूर्वी रियांशने विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी असे १५ किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर ३ तासात पोहून पार केले आहे. १५ कि.मी.चे अंतर पार करणारा रेयांश खामकर सर्वात लहान जलतरणपटू ठरला आहे. त्याची दखल ‘इंडिया बुक रेकॉर्डे'ने घेतली आहे.
रेयांश ठाणेतील नौपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विद्यार्थी आहे. गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये रेयांशने १३ पदके प्राप्त केली आहेत. त्यात ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.