कल्याण-डोंबिवली मधील उद्याने आता अधिक सुरक्षित़, सुशोभित

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील उद्यानांमध्ये वाढती गर्दी आणि त्यातून उदभवणाऱ्या सुरक्षेच्या समस्यांचा विचार करुन कल्याण-डोंबिवली महापालिका तर्फे उद्यानांच्या सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील उद्यानांमध्ये सीसीटीव्ही आणि डेकोरेटिव्ह लाइटिंग करण्याच्या कामांची अंमलबजावणी आता पूर्ण झाली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी उद्यानांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी आणि नागरिकांना संध्याकाळी फिरताना सुरक्षित आणि सुखद अनुभव मिळावा यासाठी आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विद्युत विभागाला दिले होते. त्यानुसार विद्युत विभागाने फास्ट ट्रॅकवर उद्यानांमध्ये सीसीटीव्ही आणि डेकोरेटिव्ह लाइटिंग करण्याची कामे करुन उद्दिष्ट पूर्ण केले आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत आणि यांत्रिकी विभाग) प्रशांत भागवत यांनी दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिका तर्फे एकूण १७९ सीसीटीव्ही कॅमेरे विविध उद्यानात बसवण्यात आले आहेत. यामुळे वॉकर्स, ज्येष्ठ नागरिक, मुले-मुलींसोबत येणारे पालक आणि महिला या सर्वांच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे. काही उद्यानांमध्ये पूर्वी गर्दुल्ल्यांच्या भटक्या टोळ्या, मद्यप्राशन करणाऱ्यांची गर्दी, वाद-विवाद यांसारख्या उदभवणाऱ्या समस्यांवर आता नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील उद्यानांमधील संध्याकाळचे अंधारे कोपरे एक मोठा मुद्दा होता. यावर उपाय म्हणून महापालिकेने १६७ डेकोरेटिव्ह पोल बसवून प्रकाशयोजना सुधारली आहे. यामुळे उद्यानांचा एकूण माहोल सुखद झाला असून, रात्रीही लोक उद्यानांमध्ये निर्धास्तपणे फिरु शकतात, असे महापालिका अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली शहरातील उद्यानांमध्ये सीसीटीव्ही आणि डेकोरेटिव्ह लाइटिंग करण्याच्या संपूर्ण प्रकल्पावर ३ कोटी रुपये खर्च झाला आहे. नवीन सीसीटीव्ही आणि प्रकाशयोजनांमुळे उद्यानांचा चेहरामोहरा बदलला असून, नागरिकांनी महापालिकेच्या उद्यानांमध्ये सीसीटीव्ही आणि डेकोरेटिव्ह लाइटिंग करण्याच्या कामाचे स्वागत केले आहे.

काही उद्यानांत रात्रीच्या वेळेत वाढलेली गस्त आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जोड मिळाल्याने असामाजिक प्रकार रोखण्यास मोठी मदत होणार आहे. कल्याण मधील शेनाळे तलाव, नाना धर्माधिकारी उद्यान, माता रमाबाई आंबेडकर उद्यान, रुक्मिणीबाई दवाखाना परिसर, डोंबिवली मधील मिनाताई ठाकरे उद्यान, सावित्रीबाई फुले रंगमंदिर, क्रीडासंकुल तरण तलाव, आनंदनगर उद्यान, भागशाळा मैदान या उद्यानांमध्ये १७९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. - प्रशांत भागवत, अतिरिक्त शहर अभियंता - कल्याण-डोंबिवली महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१४ गावांतील जिल्हा परिषद शाळांचा लवकरच कायापालट