वाढते रेल्वे अपघात; ‘राष्ट्रवादी'चा रेल्वे प्रशासनाला अल्टीमेटम

ठाणे : गर्दीच्या वेळी धिम्या लोकलची संख्या न वाढविल्याने गर्दी वाढत आहे. परिणामी, लोकलमधून पडून प्रवाशांचे दुर्देवी मृत्यू होत आहेत. त्यामुळे नवीन रेल्वे मार्गिकांवरही गर्दीच्या वेळेत धिम्या लोकलच्या चालवाव्यात, तसेच दहावी, बारावी परीक्षार्थींसाठी लोकलचा एक डबा राखीव ठेवावा, आदि मागण्यांसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष'ने रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक दिली. दरम्यान, रेल्वे अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,  असा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला.

१० फेब्रुवारी २०२६ रोजी, बारावीचा पहिला पेपर देण्यासाठी निघालेल्या सोहम कटरे या विद्यार्थ्याचा दिवा-मुंब्रा दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला. लोकलमधील वाढत्या गर्दीला सामावून घेण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहेत, असा आरोप करीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष'चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक देण्यात आली. याप्रसंगी स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांच्याशी झालेल्या चर्चेत मनोज प्रधान, नगरसेवक सुधीर भगत, नगरसेविका दिपाली भगत, मनिषा भगत यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडल्या. या समस्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन देवधर यांनी दिले.

दरम्यान, सोहम कटरे या विद्यार्थ्याचा मृत्यू वाढत्या गर्दीमुळे झाला असल्याने गर्दी आटोक्यात आणण्यासाठी धिम्या लोकल गाड्यांची संख्या वाढवावी. पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांची निर्मिती केल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवर धिम्या रेल्वेगाड्या चालविणे गरजेचे असताना त्यावर जलद गाड्या सोडण्यात येत आहेत. परिणामी, कोपर, ठाकूर्ली, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवरील गर्दी वाढत असते. त्यामुळे तिसऱ्या (अप) आणि चौथ्या (डाऊन) मार्गिकेवर गर्दीच्या वेळात (अनुक्रमे सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्रौ ९) धिम्या गाड्या चालवाव्यात. १५ डब्यांच्या लोकल चालविण्याऐवजी एसी लोकलची संख्या कमी करून धिम्या लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात. दिवा स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मवरुन लोकल सुरु करावी आणि मुंब्रा येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने शक्य असल्यास मुंब्रा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल सुरु करावी, आदि मागण्यांचे स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन पुढे वर्ग करण्याबाबतही स्टेशन प्रबंधक देवधर यांनी शिष्टमंडळास सांगितले.

पत्रकारांशी संवाद साधताना मनोज प्रधान यांनी ‘मध्य रेल्वे'वर वर्षाकाठी २१८० अपघाती मृत्यू होत आहेत. ठाणे स्टेशन परिसरात वर्षाला २८७ अपघात होत आहेत. म्हणजेच दररोज सरासरी सात मृत्यू होत आहेत. सदर मृत्यू फक्त गर्दीमुळे होत आहेत. एसी ट्रेनची गरज असली तरी सलग एसी ट्रेन न चालविता २ एसी ट्रेनदरम्यान २ ते ३ साध्या लोकल सोडणे गरजेचे आहे. जेणेकरुन गर्दीचा निचरा होणे सोयीचे होणार आहे. मुंब्रा स्टेशन येथे कौसा, शिळपासूनचे लोक येत आहेत. तेथेही होम प्लॅटफॉर्मची गरज आहे, असे प्रधान यांनी सांगितले. तसेच आगामी काळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची वेळ गर्दीच्या काळातील नसावी, यासाठी विनंती शिक्षण खात्याला करणार असून परिक्षार्थींसाठी एक डबा राखीव ठेवण्यासाठीही ‘रेल्वेे'कडे आपण मागणी केली असल्याचेही मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर वाढती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवर स्लो लोकल चालविणे गरजेचे आहे, असे सुधीर भगत यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेविका दिपाली भगत, महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसूद खान, जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, मेहरबानो पटेल, गजानन चौधरी, ज्योती निबार्गी, शशिकला पुजारी, राजु चापले, विष्णू माने, जगत सिंग, सुनील तिवारी, साहिल उदुगडे, श्रीकांत बर्वे, वनिता भोर, दिलीप नाईक, पद्माकर पाटील, शिवा कालू सिंह, रुबीना शेख, दिपा गावंड, बबन सांगळे, नथु चव्हाण, रेश्मा भानुशाली, निलेश जाधव, पुजा जाधव, चंद्रकांत गायकवाड, मेघराज पांडे, मंदार गांगळ, धर्मेंद्र अस्थाना, सायना आझमी, हाजी बेगम शेख, आदि उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

७ वर्षीय जलतरणपटू रेयांश खामकरच्या विक्रमाची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद