अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
नवी मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून ‘अनावरण'च्या प्रतिक्षेत असलेल्या नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण अखेर २१ नोव्हेंबर रोजी वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ‘बेलापूर'च्या आमदार मंदाताई म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे उपस्थित होते.
१६ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या परवानगीविना मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण केल्याने वाद उफाळला होता. सदर प्रकरणानंतर अमित ठाकरे यांच्यासह ७० मनसैनिकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने सदर प्रकरण अधिक चिघळले होते. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर सदर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीतील सदरचा पहिला गुन्हा ठरला आहे.
या प्रकारानंतर नवी मुंबई महापालिकाने नेरुळ, सेक्टर-१ राजीव गांधी उड्डाणपुलाजवळील छत्रपती शिवराय यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण करण्याचा निर्णय तत्काळ घेतला. ना. गणेश नाईक यांच्या उपस्थितीत यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे विधीवत पुजन करण्यात आले. त्यासाठी रायगडावर पुजा-अर्चा करणारे पुजारी कृष्णा पाटील, ज्ञानेश्वर लोहार, अनंत केरेमणी उपस्थित होते. या समारंभानिमित्त संपूर्ण चौक शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता.
तर या पुतळा अनावरण प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्याने शिवसेना-भाजप मधील दुफळीचे चित्र उपस्थिताना दिसून आले.
सदर समारंभप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, संपत शेवाळे, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, माधुरी सुतार, मीरा पाटील, इतर लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
अमित ठाकरे यांच्याकडून गुन्हा नव्हे उत्स्फुर्त कृती...
सदर पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी गणेश नाईक यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याचे आवाहन पोलिसांना केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणास उशीर होत असल्याने अमित ठाकरे यांनी ते पाऊल उचलले. त्यांनी केलेली कृती गुन्हा नसून उत्स्फुर्त कृती आहे. राज ठाकरे व आमचे जुने संबंध आहेत. ते विनाकारण कायदा तोडणारे नेते नाहीत. असे म्हणत अमित ठाकरे यांच्या कृतीचे समर्थन वन मंत्री गणेश नाईक यांनी केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
शिवरायांच्या पुतळ्याचे वैशिष्ट्यः
नेरुळ, सेक्टर-१ मधील चौकामध्ये असलेल्या घुमटाकार मेघडंबरीखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ब्रॉन्झ धातुच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सिंहासनासह १२ फुट उंच आणि २.५ टन वजनाचा असलेल्या या प्रेरणादायी पुतळ्याच्या भोवती ऐतिहासिक वातावरण निर्मितीसाठी सभोवतालच्या क्षेत्राचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्याठिकाणी ४ भाला धरलेले मावळे आणि तोफांसहित ३ मावळे यांच्या शिल्पाकृती उभारण्यात आल्या आहेत. ‘शिल्पसृष्टी कला प्रतिष्ठान'चे प्रमुख शिल्पकार प्रा. मोरेश्वर पवार यांनी पुतळ्याची निर्मिती केली आहे. पुतळा स्थापनेसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय परवानग्या प्राप्त आहेत.