नवी मुंबईत लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जींग स्टेशन
नवी मुंबई : प्रदुषण नियंत्रणावर भर देत पर्यावरणशील शहर म्हणून नवी मुंबई अग्रभागी असावे यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध पर्यावरणपूरक बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे.
इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराला चालना देऊन हवेचे प्रदुषण रोखणे, ध्वनी प्रदुषण कमी करणे, ऊर्जा बचत आणि ग्रीन हाऊस गॅसचा प्रभाव कमी करुन पर्यावरण संतुलनाकरिता इलेक्ट्रिक वाहने २०३० पर्यंत किमान ३० टक्के असावीत या केंद्र शासनाच्या धोरणान्वये उद्दिष्टपूर्तीकडे लक्ष दिले जात आहे.
याविषयी राज्य शासनानेही फेब्रुवारी २०२२ मध्ये या धोरणाचा अवलंब केला आहे. निती आयोग यांनी देखील सन २०३० पर्यंत ८० टक्के दुचाकी-तीन चाकी वाहने, ५० टक्के चारचाकी वाहने आणि ४० टक्के बसेस या इलेक्ट्रिक असण्याची संकल्पना मांडलेली आहे. त्यास अनुसरुन या इलेक्ट्रिक वाहनांकरिता पुरेशा प्रमाणात चार्जींग स्टेशन्स उपलब्ध करुन देण्याकडे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिले जात आहे.
इलेक्ट्रिक वाहनांकरिता (ई व्ही – EV) चार्जींग स्टेशन उभारण्यासाठी किमान ७० चौ.मी. इतकी जागा आवश्यक असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात रस्त्यालगतच्या उपयुक्त जागा अर्थात ले-बे, मॉल्स, विभाग कार्यालये, महापालिका मुख्यालय, मंगल कार्यालये, उद्याने, वाहनतळे अशा गर्दीच्या जागांलगत तसेच महापालिकेच्या अखत्यारितील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणानुसार शहरामध्ये १ चौ.कि.मी. ग्रीडचा क्लस्टर प्रस्तावित असून त्यामध्ये ६ इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जींग स्टेशन प्रस्तावित आहेत. सध्या जागेची उपलब्धता लक्षात घेता एका क्लस्टरमध्ये ५ ईव्हीसीएस प्रस्तावित आहेत. अशाप्रकारे एवूÀण २४ ईव्हीसीएस क्लस्टर म्हणजेच १४३ चार्जींग पॉईंटस् उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांना आपले इलेक्ट्रीक वाहन चार्ज करण्यासाठी उद्याने, मोकळ्या जागा, बस टर्मिनस, मॉल, वाणिज्य संकुले अशा वर्दळीच्या स्थळांजवळच इलेक्ट्रीक वाहन चार्जींग सुविधा उपलब्ध होणार आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सरकारी खाजगी भागीदारी (पीपीपी माडेल) तत्वावर २४ ईव्हीसीएस क्लस्टर म्हणजेच १४३ चार्जींग पॉईंटस्पैकी सद्यस्थितीत परिमंडळ-१ साठी ४ चार्जींग स्टेशन, क्लस्टर तसेच परिमंडळ-२ साठी ४ चार्जींग स्टेशन, क्लस्टर असे एकूण ८ चार्जींग स्टेशन, क्लस्टर म्हणजेच ४८ चार्जींग पॉईंटस् उभारण्यात येत आहेत. जागेच्या उपलब्धतेप्रमाणे नियुक्त एजन्सीला ईव्हीसीएस उभारण्याकरिता जागा उपलब्ध व्ग्रुन देण्यात येणार आहे.
या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून मे. काय वबी बॅटरीज् प्रा. लि., मे. रोड ग्रीड इंडिया प्रा. लि. आणि मे. डेल्टा इलेवट्रॉनिवस प्रा. लि. या एजन्सीज् मार्फत चार्जींग स्टेशन, क्लस्टर स्वखर्चाने उभारणी करण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेला ४ रुपये प्रती किलोव्हॅट इतके उत्पन्न मिळणार आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत मिलीयन प्लस सिटी गटातील शहरांना हवा गुणवत्ता सुधारणा घटकाकरिता प्राप्त निधीमधून यासाठी २ कोटी रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे.
या अंतर्गत सर्व पब्लिक चार्जींग स्टेशन्स वरील जाहिरातींकरिता महापालिकेने संबंधित एजन्सीला विद्युत रोषणाईसहीत मोकळी जागा नेहमी उपलब्ध करुन द्यावयाची आहे. सदर जाहिरातींपासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये महानगरपालिकेचाही हिस्सा असणार आहे. शिवाय या जागांवर महापालिका विविध शासकीय योजना, उपक्रम यांच्या जाहिराती, होर्डींग्ज प्रदर्शित करु शकतील. पब्लिक चार्जींग स्टेशन क्षेत्राच्या ठिकाणी मोकळी जागा उपलब्ध असल्यास महापालिकेच्या पूर्वपरवानगीने नियुक्त एजन्सी पाकीटबंद खाद्यपदार्थ, पाणी इत्यादी विक्रीसाठी किऑक्स उभारु शकतील.
पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी पहिल्या टप्प्यात दोन्ही परिमंडळ क्षेत्रात प्रत्येकी ४ अशी एकूण ८ इलेक्ट्रिक वाहन सार्वजनिक चार्जींग स्टेशन उभारण्यात येत आहेत. सदर बाब नवी मुंबईची ओळख पर्यावरणशील शहर म्हणून दृढ करण्यामध्ये लक्षणीय भर घालणारी आहे.