वाशी वाहतूक शाखेची कडक कारवाई – २६५ वाहनांवर दंडात्मक कारवाई
नवी मुंबई : वाहतूक शिस्तीचे वाढते उल्लंघन रोखण्यासाठी वाशी वाहतूक विभागाने बुधवारी विशेष मोहिम राबवित कडक कारवाई केली. वाशी वाहतूक शाखेच्या अंतर्गत स्ट्राइकिंग स्टाफच्या सहकार्याने ही मोहीम हाती घेण्यात आली. या विशेष ड्राईव्हदरम्यान बसस्टॉप पार्किंग, डबल पार्किंग, फुटपाथवर वाहन उभे करणे, हेल्मेट न वापरणे, रॉंग साईडने वाहन चालविणे अशा विविध प्रकारच्या नियमभंग करणाऱ्या एकूण २६५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या वाहनचालकांकडून एकूण ६२,००० इतका दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कदम यांनी दिली. त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियम मोडणाऱ्यांवर या पुढील काळातही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अपघातमुक्त शहरासाठी नियमांचा आदर करावा, असे आवाहन वाशी वाहतूक शाखेमार्फत करण्यात आले आहे.