हुतात्मा दिवस पूर्वसंध्येला १३२ संस्थाकडून मानवंदना
नवी मुंबई : शिव तुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई आणि मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळ, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा दिवस पूर्वसंध्येला साहित्य मंदिर वाशी येथे ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ जिंकून देखील हरलेली लढाई' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी संयुवत महाराष्ट्र आंदोलनात शहीद झालेल्या १०७ हुतात्म्यांना नवी मुंबईतील १३२ संस्थांच्या वतीने एक, एक दीप प्रज्वलित करून वंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुकृत खांडेकर, लेखक, पत्रकार वरिष्ठ संपादक हे होते. कार्यक्रमाची सुरुवात नादवेणू अकॅडमी, ऐरोली यांचे प्रमुख आकाश सूर्यवंशी यांनी आपल्या १५ बासरीवादकांसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील वीररसातील गाणी गाऊन, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शाहीर मनोहर गोलाबरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह, अण्णा भाऊ साठे यांची, ‘माझी मैना गावाकडे राहिली' ही छक्कड सादर करत श्रोत्यांमध्ये ‘तो' काळ उभा केला. गोवर्धन देशमुख यांनी आपल्या भाषणात परप्रांतीय लोकांकडून होणाऱ्या सांस्कृतिक, भौगलिक आणि धंदा आणि नोकरी यांच्यावर अतिक्रमण कसे होत असते याबाबत सडेतोड भूमिका घेत आपले मत व्यक्त करतानाच १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाचा विसर पडू नये, फुले शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील रामराज्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन, कार्य करण्याचे आवाहन केले. संजय यादवराव यांनी मराठी माणसाने आता उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी धडपड केले पाहिजे हे सांगताना आपणास इतर कुणा परकीय, परप्रांतीय यांचा आदर्श न घेता, आपल्याच महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आचार, विचार आणि संस्कार यातून सर्व काही शिकावे असे नमूद केले. सुकृत खांडेकर यांनी आकडेवारी देत मराठी भाषा, मराठी साहित्य कशी कमी होत आहे, विविध सरकारी दवाखाने, शाळा यांचा परप्रांतीय कसा अधिक संख्येने वापर, उपभोग घेत असल्याचे प्रतिपादन करून अमराठीयांना विविध कागदपत्र उपलब्ध करून देणारे आपणच असल्याबद्दल दुःख व्यक्त केले. प्रास्ताविकामध्ये शिव तुतारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते १३२ संस्था यांच्यापर्यंत स्वतः पोहचून हा कार्यक्रम करत असताना ह्या संस्था म्हणजे आधुनिक भुईकोट किल्ले असल्याचे प्रतिपादन केले. सुभाष कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शंकर गोपाळे आणि नारायण लांडगे पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निलेश पालेकर, रविंद्र औटी, विलास समेळ , रमेश संकपाळ, प्रा. नाना पाटील, श्री.मोरे, कल्पना देशमुख, सौ.ज्योती माळी, सौ. मनिषा पाटील, रुद्राक्ष पातारे आदिंनी अविश्रांत मेहनत घेतली.