प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण, जंतूनिर्मूलन मोहिमेचा शुभारंभ
नवीन पनवेल : मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीमधील भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि जंतूनिर्मूलन मोहिमेचे उद्घाटन ८ एप्रिल रोजी आकुर्ली येथे ‘रायगड जिल्हा परिषद'चे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते संपन्न झाले. पनवेल तालुक्यात पहिल्यांदाच श्वानांचे निर्बीजीकरण होणार आहे.
पनवेल तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे श्वानांचे निर्बीजीकरण करणे आवश्यक होते. दरवर्षी हजारो नागरिकांना कुत्रे चावे घेतात. त्या संदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील पाठपुरावा केला. पनवेल तालुका गटविकास अधिकारी समीर वाठारकर आणि पशुसंवर्धन विभाग यांनी यासाठी पुढाकार घेतला. रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला ‘भाजपा'चे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ‘पनवेल तालुका पंचायत समिती'च्या सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, रायगड जिल्हा परिषद सदस्य प्राची जाधव, आत्माराम भस्मा, पनवेल तालुका पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, वैशाली सावंत, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्यासह पनवेल तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, नागरिक उपस्थित होते.
वाढत्या भटक्या श्वानांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने श्वानांचे निर्बीजीकरण मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पशुसंवर्धन विभाग, पनवेल पंचायत समिती, आकुर्ली ग्रामपंचायत आणि युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी यांच्या माध्यमातून श्वान निर्बीजीकरण अभियान राबविण्यात येत आहे.
श्वान निर्बीजीकरण मोहिमेमुळे रेबीजसारख्या आजारांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी ‘रायगड जिल्हा परिषद'चे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी व्यक्त केला.