महापालिका स्वच्छता विभागाचा ढिसाळ कारभार

वाशी : तुर्भे येथील गणपती पाडा श्री गणेश मेडिकल परिसरात गटारावर करण्यात आलेल्या पानटपऱ्या आणि पक्क्या अतिक्रमणामुळे गंभीर अस्वच्छता निर्माण झाली आहे. गटार तुंबून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, समाज माध्यमांवर देखील नवी मुंबई महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘आम्हालाच गटार साफ करावे लागते का?' असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे.

दरम्यान, रात्री अतिक्रमण वाढवणे तसेच काही बेकायदेशीर हालचाली सुरु असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे.यासंदर्भात शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा ऐरोली मतदारसंघ शहरप्रमुख महेश कोटीवाले यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे तक्रार नोंदवून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.मात्र तक्रार करुन देखील महापालिका स्वच्छता विभाग दुर्लक्ष करीत असल्याने येथील नागरिकांवरच स्वतः साफसफाई करण्याची वेळ आली आहे.

‘नागरिकांना मूलभूत स्वच्छता सुविधा देण्यात महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. वारंवार तक्रारी करुनही कारवाई होत नसेल, तर नागरिकांचा संताप उफाळून येणारच आहे. तात्काळ अतिक्रमण हटवले नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरुन महापालिका विरोधात तीव्र आंदोलन छेडू', अशा इशारा महेश कोटीवाले यांनी दिला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुंबई, ठाणे परिसरातील विजेची मिटली चिंता