मिरा-रोडच्या आगीत गोदाम भस्मसात

भाईंदर : मिरा-रोड येथील काशिमीरा परिसरात असलेल्या कृष्णस्थळ संकुलातील फर्निचर आणि मंडप रोषणाईचे सामान ठेवण्यात येणाऱ्या मोठ्या गोदामाला लागलेल्या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असून शेजारील ५ इमारती आगीच्या विळख्यात सापडून त्यातील अनेक सदनिकेतील फर्निचरसह इतर सामान भस्मसात झाले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. यानंतर महापालिकेने २५ मार्च रोजी सकाळपासून शहरातील अनधिकृत फर्निचर आणि मंडप डेकोरेटर्सवर तोडक कारवाई सुरु केली आहे.

मिरा-रोड येथील प्लेझंट पार्क भागात असलेल्या कृष्णस्थळ संकुलातील फर्निचर आणि मंडप डेकोरेटर्सच्या गोदामाला २४ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यानंतर काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. धुराचे प्रचंड लोट दूर दूरपर्यंत गेले. आगीची झळ आजुबाजुच्या ५ इमारतींना लागली, इमारतीतील खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि परिसरात एकच खळबळ उडाली. त्यातच आगीत गॅस सिलेंडर फुटण्याचे आवाज येत असल्याने घबराटीचे वातावरण पसरले. अग्निशमन दलाच्या गाड्याना आगीच्या स्थळी पोहोचण्यासाठी अनेक समस्येला तोंड द्यावे लागले. याच भागात मंगळवार मार्केट भरत असल्याने गाडीला जगाच मिळत नव्हती. यानंतर घटनास्थळी पोहोचून अग्निशमन जवानांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले.

दरम्यान, महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, स्थानिक नगरसेविका सुरेखा सोनार, मोहन म्हात्रे यांनी घटनास्थळाला २५ मार्च रोजी भेट दिली.

यासंदर्भात महापालिकाकडून मिळालेल्या माहितीनुसार २४ मार्च रोजी रात्री ०८.५५ वाजता सिल्वर पार्क अग्निशमन स्थानकास  ऋतुजा वाघ यांच्याकडून दूरध्वनीद्वारे आग लागल्याची माहिती प्राप्त झाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन वाहन यांनी सुमारे रात्री ९ वाजता घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या मंडप डेकोरेशन साहित्य आणि फर्निचरला आग लागल्याचे निदर्शनास आले.

आगीचे वाढते स्वरूप लक्षात घेऊन तत्काळ होज लाईन टाकून आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले. परिसरात निवासी इमारती मोठ्या प्रमाणात असल्याने आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे स्व. कल्पना चावला, कनकिया, नवघर आणि पेणकरपाडा या अग्निशमन स्थानकांमधून अतिरिक्त मनुष्यबळ आणि अग्निशमन वाहने तात्काळ बोलावण्यात आली. सर्व पथके घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर चारही बाजुंनी पाण्याचा मारा करुन रात्री सुमारे ११.३० वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यानंतर कुलिंगची प्रक्रिया पहाटे ४ वाजेपर्यंत सुरु होती. यानंतर आग पूर्णपणे विझविण्यात आली.

सदर भागात अनधिकृतपणे सुरु असलेल्या अशा व्यवसायांबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा मिरा-भाईंदर महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही आणि प्रशासनाच्या याच हलगर्जीपणामुळे आज सदरचे मोठे संकट ओढवल्याचे रहिवाशांनी सांगितले. सदर जागा राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची आहे, तर भाडे वसुली करण्याचे काम नगरसेवकाकडून केले जाते, अशी माहिती ‘मनसे'चे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी दिली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उल्हासनगर महापालिकेचे ९९७ कोटींचे अंदाजपत्रक सादर