थकीत कर वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने धडक मोहीम सुरु केली आहे. २० मार्च २०२६ पर्यंत एकूण मागणी २२८९.७३ कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी ६७०.२६ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. उर्वरित १७६४.५५ कोटी रुपये वसूल करण्यासाठी मालमत्ता कर विभागाकडून मोहीम सुरु करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाच्या वतीने थकबाकी वसुलीसाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये थकबाकीदार नागरिकांना मालमत्ता कर भरण्याचे रिक्षाद्वारे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही कार्यालये सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वसुली वाढविण्यासाठी १३ स्वतंत्र वसुली पथके कार्यरत करण्यात आली आहेत. कर थकबाकीदारांना प्रत्यक्ष भेट देऊन नोटीस वितरण आणि जप्ती (अटकावणी) कारवाई करण्यात येत आहे. १८ मार्च पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईनुसार कामोठे, कळंबोली, खारघर, पनवेल, उपविभाग नावडे या नोडमध्ये एकूण १४०३ नोटिसा बजावण्यात आल्या असून ६३ अटकावणी कारवाया करण्यात आल्या आहेत.

तसेच थकबाकीदारांची यादी वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द करण्याची कार्यवाही सुरु असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पत्रके, सोशल मीडिया आणि स्टिकर्सच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येत आहे.

महापालिकेच्या वतीने नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरल्यास २ टक्के सवलत देण्यात येत आहे. नागरिकांनी panvelmc.org या संकेतस्थळावरुन सहजपणे कर भरता येणार आहे. याशिवाय, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी KARMITRA App व Panvel Connect App उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती उपायुक्त स्वरुप खारगे यांनी दिली आहे.

अटकावणीची कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर धारकांनी वेळेत भरावा. महापालिकेच्या विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
-मंगेश चितळे, आयुक्त-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल परिसरात पाणीटंचाई