प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां'चे नाव
भिवंडी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर दिले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट बैठकीत सादर करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी आपल्याला दिली आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लवकरच दि. बा. पाटील यांचे नाव लागणार आहे, अशी माहिती ‘भिवंडी'चे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या संदर्भात आपण अनेकवेळा संसदेत मागणी केली आहे. गत आठवड्यात आपण स्वतः केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री नायडू यांची भेट घेतली असता अनेक वर्षांपासून कॅबिनेटमध्ये न आलेला प्रस्ताव आता लवकरच कॅबिनेटमध्ये सादर होणार असून याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही ना. नायडू यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळणार असून तो येथील स्थानिक भूमीपुत्रांचा विजय असल्याचे खा. सुरेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
मुरबाडकरांची रेल्वे प्रतिक्षा लवकरच संपुष्टात...
कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी १,४०० कोटी रुपये भूमी अधिग्रहणासाठी खर्च येणार असून या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सकारात्मक असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चर्चा झाली असून लवकरच कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली असल्याची माहितीही खासदार म्हात्रे यांनी यावेळी या पत्रकार परिषदमध्ये दिली.
लांब पल्ल्याच्या ट्रेनला भिवंडी स्थानकात थांबा...
लांब पल्ल्याच्या ट्रेन भिवंडी रोड रेल्वे स्थानकात थांबत नसल्याने भिवंडीतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची बाब केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडली असून दिवा-वसई या मार्गावरुन जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या ७ गाड्यांपैकी ३ गाड्या भिवंडी रोड रेल्वे स्थानकात थांबणार आहेत. त्यामुळे येथील प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून वाशिंद येथील तिसऱ्या चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण झाल्या नंतर दिवा-वसई मेमु ट्रेन थेट मुंबई सीएसएमटी पर्यंत नेता येणार असल्याचे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिल्याचे खा. सुरेश म्हात्रे यांनी सांगितले.
बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरी सुविधा...
बदलापूर रेल्वे स्थानकातील अनेक नागरिक समस्या प्रलंबित असून येथील ‘रेल्वेे'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अपघाती निधन झाल्याने लवकरात लवकर येथे नवीन वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत आपण स्वतः बैठक घेऊन बदलापूर, आसनगांव, वाशिंद आणि भिवंडी रोड रेल्वे स्थानकांच्या नागरी सुविधांची सोडवणूक करणार असल्याचे आश्वासन देखील रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याची माहिती देखील खा. म्हात्रे यांनी दिली.