शाळा बस, व्हॅन चालकांची सरप्राईज तपासणी

उल्हासनगर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम पवित्रा घेत उल्हासनगर शहर वाहतूक विभागाने शाळा बस आणि व्हॅन चालकांची कसून तपासणी केली. शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ होऊ नये, यासाठी पोलिसांनी केवळ कागदपत्रांची पडताळणीच केली नाही, तर चालकांची ‘ब्रेथ ॲनालायझर'द्वारे अल्कोहोल चाचणीही केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध शाळांच्या परिसरात आणि प्रमुख मार्गांवर १८ फेब्रुवारी रोजी सदर विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत शाळा बस आणि व्हॅनची तांत्रिक स्थिती, फिटनेस सर्टिफिकेट, विमा, वाहन परवाना आणि आरटीओ नियमावलीनुसार आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. वाहन चालक मद्यप्राशन करूरुन वाहन चालवत नाहीत ना, याची खात्री करण्यासाठी त्यांची जागेवरच चाचणी करण्यात आली.

वाहतूक पोलिसांच्या या ‘सरप्राईज' कारवाईमुळे नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली. ज्या वाहनांमध्ये त्रुटी आढळल्या, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून काहींना कडक ताकीद देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे. त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशी कोणतीही बाब खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी यावेळी दिला.

या मोहिमेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ काळे, संतोष भोईर, संजय बेंद्रे, जितेंद्र चित्ते, मनोज काळे, नाना आव्हाड, भारत खांडेकर आणि रणजीत खोत यांनी सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान, पोलिसांच्या या सजग भूमिकेमुळे पालकांमधून समाधान व्यक्त होत असून, यापुढेही अशा तपासण्या नियमित सुरु राहणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या वतीने अभिवादन