प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
टिटवाळा पश्चिम वासुंद्री रस्त्यावरील सीसीटीव्ही अनेक महिन्यांपासून बंद
कल्याण : शहरातील वाढती वर्दळ, गुन्हेगारीच्या घटना आणि सुरक्षिततेबाबतची चिंता लक्षात घेता सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस तपासाचे डोळे मानले जातात. मात्र, ज्या कॅमेऱ्यांवर नागरिकांची सुरक्षा अवलंबून आहे, तेच कॅमेरे बंद पडल्याने टिटवाळा पश्चिमेतील वासुंद्री रस्त्यावरील परिस्थिती गंभीर बनली आहे. पंचवटी चौक, ज्ञानेश्वर मंदिर परिसर, तसेच पाटील नगराच्या पुढे महाकालेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या चौकातील रस्त्यावर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक महिन्यांपासून निष्क्रिय अवस्थेत असल्याचे समोर आले आहे.
वासुंद्री रस्ता परिसरातील अत्यंत वर्दळीचा आणि संवेदनशील मार्ग मानला जातो. मंदिर परिसर, रहिवासी वसाहती, दुकाने आणि सततची वाहनांची ये-जा यामुळे येथे दिवसरात्र गजबजाट असतो. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असणे अत्यावश्यक असताना ते बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. चोरी, छेडछाड, अपघात किंवा अन्य गुन्हेगारी घटना घडल्यानंतर पोलिस तपासात सीसीटीव्ही फुटेज अत्यंत पोलीस तपासात महत्त्वाचा दुवा ठरतो. मात्र, सदर कॅमेरेच बंद असल्याने तपासात अनेक महत्त्वाचे धागे निसटतात. गुन्हेगारांचा माग काढणे कठीण होते आणि तपास अधिक क्लिष्ट बनतो.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा संबंधित यंत्रणेकडे तक्रारी करुनही या कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीबाबत ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. स्मार्ट सिटी, सुरक्षित शहर अशा घोषणा केल्या जातात; पण प्रत्यक्षात आमच्या परिसरातील कॅमेरे महिनोन् महिने बंद आहेत. एखादी गंभीर घटना घडल्यावर जबाबदारी कोण घेणार? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असल्याचेही चित्र आहे.
दरम्यान, टिटवाळा शहरातील इतर भागांमध्येही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभालीचा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. कॅमेरे बसवणे एक बाजू असली तरी त्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती आणि कार्यरत स्थिती कायम ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा सदर कॅमेरे केवळ खांबावर लटकलेली शोभेची साधने ठरुन राहतात, असा टोला नागरिकांकडून लगावला जात आहे.
एकूणच, वासुंद्री रस्त्यावरील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे. संबंधित महापालिका, स्मार्ट सिटी यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कॅमेरे सुरु करण्यासाठी ठोस कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांची सुरक्षा केवळ कागदावरील योजना न राहता प्रत्यक्षातही दिसली पाहिजे, हीच अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, याबाबत स्मार्ट सिटी विभाग अंतर्गत ‘सीसीटीव्ही'च्या मेटेनन्स विभागातील प्रमोद कांबळे यांच्याशी विचारणा केली असता मी माहिती घेऊन कळवतो, असे त्यांनी सांगितले.