प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
‘केडीएमसी'मध्ये भराव, कांदळवन कत्तलीने पर्यावरणाला धोका
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिा क्षेत्रात (कडोंमपात) भराव, कांदळवन कत्तलीने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पर्यायाने सीआरझेड, आरआरझेडच्या ऱ्हासाला पायबंद कधी बसणार? असा सवाल आता पर्यावरणवादी विचारत आहेत. सीआरझेड आरआरझेड क्षेत्राचा वाढता ऱ्हास पाहता यावर प्रशासनाने कठोर पायबंद घालत सदर क्षेत्र संरक्षित करणे गरजेचे आहे. गेल्या ८ वर्षात प्रशासकीय राजवटीत सीआरझेड, आरआरझेड क्षेत्रात झालेले अनधिकृत भराव आणि कांदळवनाच्या ऱ्हासाचा फटका पाहता प्रशासनाने सीआरझेड, आरआरझेड क्षेत्राची कठोर अमंलबजावणी केली पाहिजे, असेही पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
डोंबिवली मधील कोपर, आयरे आणि मोठागांव या खाडीनजिकच्या भागांत सीआरझेड उल्लंघन करुन चाळी बांधल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. भूमाफियांनी खाडीकिनारा भागात भराव टाकून अतिक्रमण केले असून, त्यावर कारवाईसाठी पर्यावरणप्रेमी सातत्याने मागणी करीत आहेत. शहरातील जमिनी संपल्याने अनधिकृत बांधकामदारांनी आता आपला मोर्चा खाडीकिनारी वळवला आहे. या अनधिकृत बांधकामासाठी खाडीकिनारच्या खारफुटीची तोड सुरु असून पर्यावरणाला यातून धोका निर्माण होत आहे.
खारफुटी अर्थात खाडीकिनाऱ्यावरील जमिनीवर असणाऱ्या वृक्षांना पर्यावरणाच्या दृष्टीने भरपूर महत्व आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या वृक्षांची आवश्यकता असते. या सीआरझेड क्षेत्रातील कांदळवन दलदलीच्या भागावर भूमाफियांच्या वक्रदृष्टीमुळे अनधिकृत भराव करीत बांधकामाची जागा निर्माण करायला मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल केली जात आहे. तर काही ठिकाणी विकासकामांच्या काँक्रीटीकरणामुळे कांदळवनांना फटका बसल्याने खारे पाणी येत नसल्याने कांदळवने बाधित होत आहेत.
या वृक्षतोडीकडे प्रशासन योग्य लक्ष देऊन कारवाई करत नसल्याने या वृक्षतोडीला आळा बसत नाही. ग्रामीण भागात नव्हे तर शहरी भागातील अशा खारफुटींची मोठ्या प्रमाणात तोड झाल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी खाडीकिनारे संरक्षित करुन हरितपट्ट्याचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु, आर्थिक गणितातून या खाडीकिनारी असणाऱ्या खारफुटीची कत्तल होत असल्याची चर्चा आहे. तसेच अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती, हायटाईड यावेळेस कांदळवन क्षेत्रातील खारफुटी पाण्याचा वाहता प्रवाह इतरत्र पसरण्यापासून रोखण्यासाठी नैसर्गिक स्त्रोत्र असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे खारफुटीचे संवर्धन काळाची गरज आहे.
आता तरी प्रशासनाने डोळसपणे कारवाईचा बडगा उगारीत खारफुटीची झाडे वाचवून, खाडीकिनाऱ्यांचे संवर्धन केले पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे, अशी मागणी जोर धरु पाहत आहे.
खारफुटीच्या वृक्षतोडीच्या तक्रारी आम्ही मुंबई कांदळवन कक्षाकडे वर्ग करतो, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महापालिका वृक्ष प्राधिकरण अधिकारी संजय जाधव यांनी दिली. तर नदी किनारा भागात देखील किनाऱ्यालगत भराव, नदी किनाऱ्याच्या नैसर्गिक समतोलाला बाधा आणि ते खोदकाम करीत मातीच्या नैसर्गिक उंचवटे यांचे सपाटीकरण याबाबत प्रशासनाने दक्ष राहिले पाहिजे. तसेच नदी किनाऱ्याजवळील बांधकामाबाबत नियमावलीचे काटेकोर पालन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे पर्यावरण प्रेमींना वाटत आहे.
सातपुल जेट्टी कुंभरखाण पाडा, खाडी परिसर, जुनी डोंबिवली, खाडीपरिसर कोपर खाडीपरिसर, भोपर खाडी परिसर या परिसरात कांदळवन अजुनही अस्तित्वात आहे. या संदर्भीत परिसरात विकास कामे करताना कांदळवनाचा ऱ्हास होणार नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. खारफुटीचे संवर्धन करीत या परिसरात पाणथळ, दलदलीच्या ठिकाणी आढळणाऱ्या पक्षाचा अधिवास टिकून राहण्यासाठी तसेच नैसर्गिक समतोल साधण्यासाठी खारफुटीचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
-रुपाली शाईवाले, व्यवस्थापक-पर्यावरण दक्षता मंडळ.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रफळ अंदाजे ६७.६५ चौरस कि.मी., भौगोलिक परिस्थिती समुद्र सपाटीपासून ० ते२० मीटर उंच तीन बाजूंनी खाडी यामध्ये बारावे जंक्शन जवळील कल्याण खाडी ते मोठागाव खाडी असा मोठा परिसर उल्हास खाडी सीआरझेड अंतर्गत समावेश आहे. तर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात उल्हास नदी, काळूनदी, वालधुनी नदी यादेखील बारावे जंक्शन जवळ कल्याण खाडीला येऊन मिळतात. केडीएमसी परिसरातील सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) आणि आरआरझेड (रिव्हर रेग्युलेशन झोन) संबधित नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत असून कल्याण-डोंबिवलीचा भाग खाडीच्या जवळ असल्याने येथे सीआरझेड नियम लागू होतात.