प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
औद्योगिक कचरा, सांडपाण्याने गुदमरतोय ‘वालधुनी'चा श्वास
उल्हासनगर : अंबरनाथच्या डोंगररांगांमध्ये उगम पावून उल्हासनगर शहरातून वाहणारी वालधुनी नदी आज प्रशासकीय अनास्था आणि वाढत्या प्रदूषणामुळे आपला जीव गमावताना दिसत आहे. एकेकाळी या शहराची जीवनवाहिनी असलेली वालधुनी नदी आता एका काळवंडलेल्या मृतप्रवाहात रुपांतरीत झाली असून, दर आठवड्याला बदलणारा तिच्या पाण्याचा रंग धोक्याची घंटा ठरत आहे. कधी लालसर तर कधी गडद काळा अशा छटांमध्ये वाहणारे नदीतील पाणी म्हणजे हजारो किलो औद्योगिक कचरा आणि प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचे घातक मिश्रण बनले आहे.
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसरातून वाहताना जिथे नदीचे पवित्र आणि नैसर्गिक रुप दिसणे अपेक्षित असते, तिथे आज ती केवळ नाल्यांच्या साखळीत अडकलेली पाहायला मिळते. नदीकाठच्या उद्योगांमधून थेट सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी आणि घनकचरा यामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ठिकठिकाणी साचलेले प्लास्टिक आणि रासायनिक अवशेषांमुळे तिचा नैसर्गिक प्रवाहही खंडीत झाला आहे.
उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ तर या प्रदुषणाचे विदारक दृश्य स्पष्टपणे पहायला मिळते. नुकताच बदललेला पाण्याचा काळवंडलेला रंग रासायनिक प्रदुषणाचा संशय बळकट करत असून, यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गिकेच्या कामामुळे नदीकाठावर साचलेली माती आणि बांधकाम साहित्य पावसाळ्यात थेट पात्रात जाण्याची भिती निर्माण झाली आहे. मात्र, प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कृती होताना दिसत नाही. नदी पुनरुज्जीवनाच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या असून, अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी केलेल्या पाहणीनंतरही वास्तवात कोणताच बदल घडलेला नाही.
या भीषण परिस्थितीवर भाष्य करताना ‘वालधुनी जल बिरादरी'चे पर्यावरणप्रेमी शशिकांत दायमा यांनी प्रशासनाला आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना कडक इशारा दिला आहे. वालधुनी पूर्णपणे ‘गटारगंगा' होण्यापूर्वी राजकीय मतभेद बाजुला ठेवून एक पारदर्शक आणि वेळबध्द पुनरुज्जीवन आराखडा राबवणे काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता केवळ आश्वासने नको तर प्रत्यक्ष कृती हवी, अशी भावना सजग नागरिकांकडून व्यक्त होत आहे.