हार्बर मार्गावर एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद 

नवी मुंबई  : मुंबईची उपनगरीय जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर वातानुकूलित (एसी) लोकलला प्रवाशांकडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या २६ जानेवारीला सुरु झालेल्या या एसी लोकलने अवघ्या १६ दिवसांत ६ लाख ४० हजार प्रवाशांना आकर्षित केले असून, रेल्वेच्या तिजोरीत तब्बल २.३८ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा आणि गर्दीपासून सुटका मिळवण्यासाठी हार्बरमधील चाकरमानी आता मोठÎा प्रमाणात एसी लोकलकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे.  

हार्बर मार्गावर धावणाऱया १४ नवीन एसी लोकल सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर झाल्याचे दिसून येत आहे. या वातानुकूलित लोकलमधून २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील दररोज सरासरी ४० हजार प्रवासी प्रवास करत असल्याचे मध्य रेल्वेकडुन मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. या प्रवाशांकडून दररोज सरासरी १४.९० लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळत आहे. एकूण उत्पन्नापैकी १.७९ कोटी रुपये सीझन तिकिटांमधून, तर ५९ लाख रुपये साध्या तिकीट विक्रीतून प्राफ्त झाले आहेत.  

वातानुकूलित लोकल सेवांना मिळणारा प्रतिसाद पाहता, प्रवासी आता पारंपारिक प्रथम आणि द्वितीय श्रेणी पेक्षा सुखकर प्रवासाला प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होत आहे. सुरक्षित आणि सन्मानजनक प्रवासासाठी प्रवाशांनी वैध तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. एसी लोकलचा प्रवास आरामदायी असला तरी, फुकट्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने कडक नजर ठेवली आहे. हार्बर मार्गावरील विशेष मोहिमेत १६ दिवसांत ८१० अनियमित प्रवासी आढळले असून, त्यांच्याकडून २.५० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  

मध्य रेल्वे प्रशासन एका नजरेत महत्त्वाची आकडेवारी:  
एकूण प्रवासी (१६ दिवस): ६ लाख ४० हजार
सरासरी दैनंदिन प्रवासी: ४०, ०१७
एकूण महसूल: २.३८ कोटी  
एसी लोकलच्या एकूण फेऱया (मध्य रेल्वे): ९४ (१४ हार्बर मार्गावर)  
वार्षिक दंड वसुली (२०२५-२६): ३.२२ कोटी (१.०१ लाख गुन्हे)

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कळंबोली सर्कलवरील उड्डाणपुलाच्या कामाला गती