प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
फ्रीजचा कंप्रेसर फुटून घराला आग
अंबरनाथ : येथील मोहन सुबर्बिया परिसरातील ईश्वर रेसिडेन्सी इमारतीत फ्रीजचा कंप्रेसर फुटल्याने घराला भीषण आग लागल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी घडली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या जुनेर शेख यांच्या घरात फ्रीजच्या कंप्रेसरमध्ये अचानक बिघाड होऊन स्फोट झाला आणि आगीने रौद्र रुप धारण केले. या घटनेत घरातील फर्निचर आणि अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सदर घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घरात ५ एलपीजी गॅस सिलेंडर असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून सदर सिलेंडर वेळेत बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवले. फ्रीजचा स्फोट इतका भीषण होता की, काही क्षणातच आगीने संपूर्ण घर कवेत घेतले होते; परंतु प्रशासनाच्या वेळेतील कार्यवाहीमुळे परिसरातील मोठा अनर्थ टळला आहे.